कन्येने चालवला वडिलांचा वारसा ; नीलमची झाली पोलिस उपनिरीक्षक पदी निवड…
MPSC Success Story : नीलम बालपणापासून वडिलांचे पोलिस दलातील काम बघत आली होती. आपण देखील वडिलांसारखे पोलिस व्हायचे हे तिने लहानपणीच ठरवले होते. म्हणूनच, तिने अधिकारी बनण्याची अभ्यासासाठी पुणे गाठले. ती रोज किमान दहा ते बारा तास अभ्यास करायची. एवढेच नाहीतर मैदानी सराव देखील करायची. नीलम जाधव मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेडकरवाडी येथील आहे. तिचे वडील विजय जाधव सहाय्यक पोलिस फाैजदार पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
नीलमचे शालेय शिक्षण रा.भा. शिर्के प्रशालेत झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पूर्ण केले. तिने मानसशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विविध सांस्कृतिक कार्यक्रमात नीलमचा सहभाग होताच, विविध स्तरावर तिने पारितोषिके मिळविली आहेत.एवढेच नाहीतर, तिला ‘रत्नागिरी सुंदरी’चा सन्मान मिळाला आहे.
शालेय व महाविद्यालयीन जीवनापासून हुशार असल्यामुळे
२०२० साली झालेल्या परीक्षेत मुख्य, ग्राऊंड व मुलाखतीमध्ये ५४० पैकी ३२८ गुण मिळाले आहेत. इतकेच नाहीतर ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. नीलमची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड हे फक्त कष्टाचे श्रेय नाहीतर तिने वडिलांचा कामाचा कौतुकास्पद वारसा चालवला आहे. त्यामुळे, सहाजिकच सर्वस्तरातून काैतुक करण्यात आले.