खेळाडू म्हणून जडणघडण झालेल्या शेतकरी कुटुंबातील नीलमचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर – रांजणी या गावची नीलम सूर्यकांत वाघ. रांजणी येथील शेतकरी कुटुंबातील सूर्यकांत वाघ व रूपाली वाघ यांची नीलम ही कन्या.नीलमचे वडील सूर्यकांत वाघ व आई रूपाली वाघ या शेती करत असून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. कोणतीही आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती नसूनही नीलमने यश मिळवले.
नीलमने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले असून तिने खेळाडू कोट्यातून महिला गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य विक्रीकर निरीक्षक पदी (STI) निवड झाली आहे.
नीलमचे प्राथमिक शिक्षण कारमळा येथे तर माध्यमिक शिक्षण नरसिंह विद्यालय रांजणी येथे झाले. नरसिंह विद्यालयाच्या मैदानावर इयत्ता पाचवी पासून तिने खो-खोचे धडे गिरवले.दहावी व बारावी परीक्षेत विद्यालयात प्रथम मिळवण्याची कामगिरी नीलमने केली होती.अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट करून तिने १९ वर्षीय शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असून राज्य पातळीवर विविध खो खो स्पर्धेत सुवर्ण, रौप्य,कांस्य पदके पटकावली आहेत.
रयत शिक्षण संस्थेचे नरसिंह विद्यालय ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स येथील माजी विद्यार्थिनी आणि नरसिंह क्रीडा मंडळाची खो खो खेळाडू आहे. त्यासाठी तिला राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक संदीप चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक राजू तायडे यांचे मार्गदर्शन लाभले होते. या खेळाडू कोट्यातून परीक्षा दिली आणि स्पर्धा परीक्षेची तयारी केली. याच मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य विक्रीकर निरीक्षक पदी (STI) निवड झाली आहे.