MPSC Success Story : प्रियांका कांबळे यांचे लहानपणापासूनच पोलिस खात्यात अधिकारी व्हायचे स्वप्न होते. येळपणे या छोट्याशा गावातील मजुराच्या मुलीने बघितलेलं हे स्वप्न…पण, घरची परिस्थिती बेताची…आई – वडील असे दोघेही अल्पशिक्षित…. घरची थोडी शेती पाहून मोलमजुरी करतात. पती, पत्नी व एक मुलगी, एक मुलगा, असा त्यांचा परिवार आहे. संपूर्ण परिवार हा शेतीवर अवलंबून आहे.
आई-वडील मोलमजुरी करत असलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून प्रशासकीय सेवेत नोकरी करण्याचा ध्यास घेतला. त्यावर परिस्थिती मध्ये बदल अवलंबून होता. घरच्यांनी देखील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सी. टी. बोरा महाविद्यालयात (शिरूर, जि. पुणे) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
पोलिस खात्यात वरिष्ठ अधिकारी व्हायचे स्वप्न असल्याने मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास केला.या मेहनतीच्या जोरावर तिची पोलिस म्हणून निवड झाली.यामागे दोन वर्षांची मेहनत होती. तिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू होती. यात २०२३ मध्ये यश मिळाले. पोलिस भरतीत यशस्वी झाल्यानंतरही त्यांनी आपले प्रयत्न न थांबविता अभ्यास सुरूच ठेवला. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आता पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.