गावाच्या लेकाची कमाल ; एमपीएससीच्या परीक्षेत मिळविले दुहेरी यश
MPSC Success Story : ग्रामीण भागातील मुलांना अजूनही स्पर्धा परीक्षा म्हटलं की भीती वाटत राहते. ते या सगळ्यात पडायचे धाडस करत नाही. कारण, कोणतेही यश हे कधी मिळेल या यशाची शाश्वती नसते. पण स्पर्धा परीक्षा हीच तुमच्या जगण्याला निराळी कलाटणी देऊ शकते. हाच विचार उराशी बाळगून रोहितने जिद्दीने अभ्यास केला आणि एमपीएससीच्या परीक्षेमार्फंत दोन पदे मिळवली.
रोहित साबळे हा बागलाण तालुक्यातील दहिंदुले या गावचा रहिवासी. त्याचे शालेय शिक्षण हे त्याचं भागात झाले. त्यानंतर त्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी येथे कृषी क्षेत्राचे शिक्षण घेतले.त्याच दरम्यान त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या सगळ्या प्रवासात त्याला सहकारी आणि वरिष्ठांची बरीच मदत मिळाली. या मार्गावर चालत असताना त्याला माहिती होते की जिद्दीने अभ्यास केला तर यश हे मिळेलच. तसेच झाले…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत पहिल्या प्रयत्नात त्याची एस.टी.आय म्हणून निवड झाली. अवघ्या सहा महिन्यांत वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून देखील निवड झाली.ह्या यशामागे प्रचंड मेहनत आणि जिद्द नक्कीच आहे. सध्या रोहितने वनपरिक्षेत्र अधिकारी हे पद स्वीकारले अजून त्याचे प्रशिक्षण चालू आहे. त्याचे हे यश अनेक ग्रामीण भागातील तरूणांसाठी दिशादर्शक आहे.