आई-वडिलांच्या हातातील कोयता सोडण्यासाठी त्याने MPSC चा अभ्यास अन् बनला अधिकारी ; वाचा तरुणाचा संघर्षमय प्रवास..

MPSC Success Story : सध्याच्या घडीला नोकरी मिळविणे फारच कठीण झाले आहे. त्यात बरेच तरुण-तरुणी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. महाराष्ट्रात MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. MPSC मार्फत दरवर्षी हजारो पदांसाठी भरती केली जाते. यासाठी विद्यार्थी देखील अहोरात्र मेहनत घेत असतात. मात्र यातही काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा पडते. पण दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगराएवढ्या संकटाला भेदून यशाला गवसणी घालणं शक्य होते. याचेच एक उदाहरण बीडमध्ये पाहायला मिळाले. ऊसतोडणीचे काम करणाऱ्या मजुराच्या मुलाने ऊसाच्या शेतात काम करत एमपीएससी परीक्षेत यश कमावले

नुकताच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(MPSC)च्या परीक्षेत बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील संतोष अजिनाथ खाडे याला मोठे यश मिळाले आहे. या परिक्षेत त्याची सोळावी रॅंक आली आहे. एका उसतोड कामगाराचा मुलगा अधिकारी बनणार असल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संतोष खाडे याचे आई-वडील गेल्या 30 वर्षांपासून ऊसतोडीला जात होते. यंदा मात्र त्यांच्या हातातील कोयता थांबला आहे.

संतोषचं बालपण गावातल्याच खाडे वस्तीवर गेलं. घरची आणि शेतातली कामं करत संतोषनं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्याचं प्राथमिक शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं. पुढे भगवान महाराज विद्यालय येथून त्यानं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. पदवीचं शिक्षण बलभीम महाविद्यालय बीडमधून इतिहास या विषयातून पूर्ण केलं.

संतोषनं पदवीचा अभ्यास चालू असताना त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा ठरवलं. संतोष सांगतो, “2017 पासून पदवी प्लस त्याच्याबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे दोन्हीही चालू ठेवलं. 2019 ला माझी पदवी पूर्ण झाली. त्यानंतर मग मी फुल टाईम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला.”शिवाय केवळ अभ्यासाच्या जोरावर इथं अधिकारी होता येतं आणि या माध्यमातून आई-वडिलांच्या हातातील कोयता खाली टाकता येईल, हा त्यामागचा उद्देश.

नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसेवा 2021 मध्ये संतोषने घवघवीत यश मिळविले आहे. त्याने राज्यातून या परिक्षेत त्याची सोळावी रॅंक आली आहे. एका उसतोड कामगाराचा मुलगा अधिकारी बनणार असल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, यश मिळविल्यानंतर संतोष अजिनाथ खाडे याने फेसबूक पोस्ट लिहीत आपलं हे यश आई वडीलांच्या कष्टाचं चीज असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याशिवाय मी शुन्य आहे. आई आणि बापुचं उभं आयुष्य माझ्यासाठी कष्ट करण्यात गेलंय. तेव्हा मी कुठे इथपर्यंत पोहोचलोय. एका ऊसतोड कामगाराच्या मागे भक्कमपणे उभे राहीलेलं माझं सावरगाव घाट हे गाव या गावाला मी कधीच विसरू शकत नसल्याचे संतोष खाडे याने म्हटले आहे.

संतोषनं त्याच्या आई-वडिलांचा कोयता बंद केलाय, पण पोस्ट भेटल्यानंतर जेवढे कोयते बंद करता येईल, तेवढे बंद करण्याचा त्यानं निश्चय केलाय. त्याला ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करायचं आहे.

मित्रासोबतचा करार
मधल्या काळात संतोष परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला गेला. तिथं त्याला दीपक पोळ नावाचा मित्र भेटला. या दोघांनी मग अभ्यासासाठी एक करार करून घेतला. संतोष सांगतो, “दीपक आणि मी एक अॅग्रीमेंट बनवलं दोघांचं, की आपण दोघांनी टाईमपास करायचा नाही. आपण दोघांनी मोबाईल वापरायचा नाही. मी सकाळी 7 वाजेपासून ते रात्री 1 वाजेपर्यंत मोबाईल रूममध्ये ठेवायचो आणि मी अभ्यासिकेमध्ये असायचो. मोबाईल पूर्णत: बंद असायचा.
“अभ्यासिकेत गेल्यावर एक अॅग्रीमेंटच बनवलं की, एक तासापेक्षा जास्त वेळ आपल्यापैकी कुणी अभ्यासिकेत नसेल तर 1 हजार रुपये दंड लावायचा. कुणाच्या बर्थडेला गेलो तर 500 रुपये दंड लावायचा. स्वत:चा बर्थडे साजरा केला तर 5000 रुपये दंड लावायचा. असे छोटेछोटे बंधनं आम्ही स्वत: वर घालून घेतले.”

Leave a Comment