सायलीची कृषी सेवा परीक्षेत गगनभरारी !
MPSC Success Story आपल्या इकडे अजूनही मुलींना शिक्षणासाठी झगडावे लागते.पण घरच्यांनी प्रोत्साहन दिले तर यशाची पायरी नक्कीच गाठता येते. सायलीच्या वडिलांची इच्छा होती की तिने स्वतःच्या पायावर उभे राहावे. या इच्छेने तिला त्यांनी उच्च शिक्षित केले…इतकेच नाहीतर अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. या सगळ्याची तिने देखील जाण ठेवली. तिने अहोरात्र मेहनत यश मिळवले व राज्यात पहिल्या येण्याचा मान मिळवला.
सायली साताप्पा फासके ही मूळची कागल तालुक्यातील उंदरवाडी गावची लेक. उंदरवाडीतील प्राथमिक विद्यामंदिर मध्ये त्यांचे शालेय शिक्षण व प.बा. पाटील हायस्कूल मुदाळतिठ्ठा येथे हायस्कूलचे शिक्षण झाले. बारावीचे कोल्हापुरात शिक्षण न्यू कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेतले व त्या सध्या राहुरीमध्ये त्या एमएस्सी करीत आहेत.तिचे वडील प्राथमिक शिक्षक, तर आई गृहिणी आहे. तिला नेहमीच अभ्यासाला पाठिंबा मिळाला. त्यामुळे तिने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सायली २०२० पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत.
एमपीएससीच्या वतीने कृषी सेवा २०० जागांसाठी जाहिरात करण्यात आली. मे २०२३ मध्ये मुख्य परीक्षा झाली. त्यानंतर ऑगस्टमध्ये मुलाखतीची प्रक्रिया पार पडली, त्यानंतर ९ मे २०२४ रोजी अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालात सायली फासके ही महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम आली. तिला हे दुसऱ्या प्रयत्नात कृषी सेवा परीक्षेत यश मिळाले आहे.