MPSC Success Story : सध्या बरीच तरूणाई स्पर्धा परीक्षेत येत आहे. पण वाढत्या स्पर्धेमुळे यश – अपयशावर मात करत उपाय शोधत सरकारी नोकरी मजल मारलेल्या शुभमचा प्रवास जिद्दीचा आहे.
शुभम सकाळी ग्रंथालयात जाऊन संध्याकाळपर्यंत अभ्यास करत बसायचा. या परीक्षेसाठी वेगळा काही अभ्यास न करता फक्त त्याने अभ्यासात सातत्य राखले. अभ्यासक्रम नीट समजून घेतला. आयोगाचे मागच्या वर्षातील महत्त्वाच्या प्रश्नांवर भर दिला. त्यामुळे कमी वयात लवकर यश मिळाले.
शुभम हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या साजणी गावचा आहे. त्याचे वडील प्राथमिक शिक्षक असून आई गृहिणी आहे. गावचा तरुण इतका मोठा अधिकारी झाल्यामुळे साजणी गावात आनंदाचे वातावरण आहे. शुभमचे प्राथमिक शिक्षण कुमार विद्यामंदिर साजणी येथे, तर सहावी ते दहावी नवोदय विद्यालय कागल येथे झाले आहे. अकरावी, बारावी हौसाबाई विद्यालय निमशिरगांव येथे शिक्षण झाले.
दहावीत आणि बारावीत शुभम पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. तर पुढे बीएससी केमेस्ट्रीचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातच राहून शुभमने स्पर्धा परीक्षेची तयारी खाजगी अभ्यासिकेतून सुरू केली. पाच वर्षातील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं. कमीत कमी पुस्तकं आणि जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन हा फॉर्म्युला अमलात आणला.शुभम, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांच्यातील दरी कमी करणार, त्यांच्यातील थेट संबंध वाढवण्यावर भर देण्यासाठी पदाचा वापर करणार आहे.