MPSC कडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल लागला असून यात अनेक सामान्य कुटुंबातील तरुणांनी यश मिळवलं आहे. अशातच बीड जिल्ह्यातील वाघोरा येथील शेतकरी पुत्र विजय कोंडिबा लोंढे या तरुणाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. वडिलांसोबत शेतामध्ये काम करून विजयनं मोठं यश संपादित केलं असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
विजय लोंढे यांचं मुळ गाव बीड जिल्ह्यातील वाघोरा हे आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी अनेक तरुण पुण्या-मुंबईकडे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जात असतात. परंतु, अलिकडे तालुक्याच्या ठिकाणीही अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विजयने गावातच राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे.
विजय लोंढे याचं प्राथमिक शिक्षण वाघोरा या गावातच पूर्ण झालं. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण किटी आडगाव येथे झालं. बीड येथे कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर 2018 मध्ये त्याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याने यासाठी कुठलेही क्लासेस लावले नाहीत. सेल्फ स्टडी, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्याने हे यश मिळवल्याचं विजय सांगतो.
विजयचे वडील कोंडीबा लोंढे यांना जवळपास 5 एकर शेती आहे. मात्र, ज्यावेळी विजयने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा अनेकदा शेतीच्या कामानिमित्त गावी जावे लागत होते. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्याने अनेकदा वडिलांसोबत शेतामध्ये काम देखील केले अभ्यास सुरू ठेवला मात्र जिद्द सोडली नाही. त्यामुळे आता पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.
मला पोलीस खात्यामध्ये कार्यरत व्हायचं होतं. आधीपासूनच माझी इच्छा होती. एकंदरीत पीएसआय झालोय, या गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यासारखा नाहीये. माझे आई वडील शेती करतात. अनेकदा त्यांनी मोलमजुरी करून शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्यामुळे मी त्यांचा खूप ऋणी आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मला माझ्या सहकाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले, असे विजय लोंढे यानं सांगितलं.