आई-वडिलांचे स्वप्न केले पूर्ण ; किरण झाले पोलिस उपअधिक्षक/सहायक पोलिस आयुक्त !
MPSC Success Stroy : आपल्या मुलाने पोलिस दलात क्लासवन अधिकारी व्हावे, अशी किरण यांच्या आई – वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मुलाला खूप पाठिंबा दिला. किरण यांनी देखील मेहनत घेतली आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले. बारामती तालुक्यातील काळखैरेवाडीच्या राजबाग येथे राहणारे हे शेतकरी कुटूंब. संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून… त्यात पावसावर आधारित शेती. त्यामुळे वडील मुंबईला अग्निशामक दलात नोकरीत होते. नोकरी बरोबरच छोटी-मोठी कामे करून त्यांच्या आई- वडिलांनी तुटपुंज्या पगारावर सर्व मुलांचे शिक्षण पूर्ण केले. एकाला आयटी कंपनीत इंजिनिअर केले तर बहीण शीतल पोलिस दलात आहे.
किरण भोंडवे यांचे कांदिवलीच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात शालेय शिक्षण झाले. त्यानंतर यादवराव तासगावकर महाविद्यालयात बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली…यात यूपीएससीच्या मुख्य पाच परीक्षा दिल्या. मात्र, यश मिळाले नाही. न खचता मोठ्या जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. सन २०१९ ला मुलाखत झाली. यात नऊ गुण कमी मिळाल्याने ही संधी हुकली.मग त्यांनी एमपीएससी देण्याचे ठरवले तर यात त्यांना यश आले. सन २०२० मध्ये दिलेल्या परीक्षेत नायब तहसीलदार म्हणून निवड झाली. नोकरी करत असताना सन २०२१ मध्ये दिलेल्या परीक्षेत पोलिस उपअधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त म्हणून निवड झाली.