काजलच्या जिद्दीची कमाल ; शेतकऱ्याच्या लेकीने मिळवली वर्दी !
PSI Success Story काजलची शिक्षणाविषयीची जिद्द लहानपणापासून होती. तिने आई – वडिलांना शेतात दिवसभर राबताना बघितलं होतं. याच शेतात केलेल्या कष्टाचे चीज झाले आणि काजल पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
काजल ही पाटकुल येथील राजकुमार नामदे या शेतकऱ्याची मुलगी. तिने नेहमीच शिक्षणाला घरच्या अडचणी बाजूला ठेवून प्राधान्य दिले. तिचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले तर तर माध्यमिक शिक्षण गावातील शिवाजी हायस्कूलमध्ये झाले.तिने अकरावी व बारावीचे शिक्षण बारामती येथील शारदाबाई पवार महाविद्यालयात पूर्ण केले. सन २०१८ साली पुणे येथील शासकीय महाविद्यालयातून ८३ टक्के गुण मिळवून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाली.
कृषी क्षेत्रातील बीएससी ऍग्री ही पदवी तिने संपादन केली. याच दरम्यान ती स्पर्धा परीक्षेचा दररोज नित्यनेमाने अभ्यास करायची. तिच्या वडिलांनी शेतात कष्ट करून मुलीच्या शिक्षणाची सोय केली, तिने ही परिस्थितीची जाणीव ठेवून यश संपादन केले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन काजल राजकुमार नामदे हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.