भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने सोमवारी श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयात सर्वांत वेगवान ३०० बळी घेण्याचा डेनिस लिलीचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज लिलीने १९८१ मध्ये ५६ कसोटी सामन्यांत हा विक्रम नोंदवला होता. ३६ वर्षांनंतर आश्विनने या विक्रमाला गवसणी घातली. आश्विनने विक्रमी कामगिरी करताना अनेक दिग्गजांना पिछाडीवर सोडले. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (५८ कसोटी), रिचर्ड हॅडली, माल्कम मार्शल व डेल स्टेन (६१ कसोटी) यांचा यात समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा अश्विन भारताचा पाचवा गोलंदाज आहे. त्याच्यापेक्षा अधिक बळी घेणा-या गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे (६१९), कपिलदेव (४३४), हरभजन सिंग (४१७) आणि झहीर खान (३११) यांचा समावेश आहे.