MPSC Success Story : प्रचंड मेहनत करण्याची तयारी असली की यश हे मिळतेच हे दिपालीने दाखवून दिले आहे. ग्रामीण भागातील बालपण, घरी अठरा विश्व दारिद्र्य, वडील रिक्षा चालक आणि ह्या पाच बहिणी….असे असले तरी अहोरात्र मेहनत करून दिपालीच्या वडिलांनी तिच्यासह सर्व मुलांना चांगले उच्च शिक्षण दिले.यामुळेच आता रिक्षास्टॉपवर सहकारी रिक्षावाल्याऐवजी पोलीस अधिकारी मुलीचे वडील म्हणून म्हणून हाक मारतात. याचा तिच्या वडिलांना सार्थ अभिमान वाटतो.
दिपालीचे शासकीय नोकरी मिळावी यासाठी बरेच वर्षे प्रयत्न सुरु होते. अखेर तिच्या मेहनतीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश आले. यात तिची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड झाली. विशेष म्हणजे याचकाळात क्लर्क पदासाठी दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सुध्दा दिपाली उत्तीर्ण झाली. एकाचवेळी दोन शासकीय पदे दिपालीला मिळाली. परंतू देशसेवा करावी या उद्देशाने तिने पोलीस उपनिरिक्षक पदाची निवड करण्याचे ठरविले आहे.
दिपाली सुर्यवंशी ही मूळची भुसावळमधील असून तिचे वडील निंबा सूर्यवंशी हे रिक्षाचालक आहेत. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून निंबा सूर्यवंशी हे रिक्षातून प्रवासी वाहतूक करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. पाच बहिणींमध्ये दिपाली ही सर्वांत लहान मुलगी. लहानपणपासून वडिलांचे कष्ट डोळ्यांनी बघितल्याने मेहनतीचे जाणीव होती. पण दिपालीने यांनी शासकीय नोकरीत जावे म्हणून वडिलांनी बघितले होते.
स्वप्नाच्या दृष्टीने वाटचाल सुरु करण्यापूर्वीच याचदरम्यानच्या काळात २००८ मध्ये दिपालीचे लग्न झालं.शिरपूर तालुक्यातील अर्थ हे गाव दिपालीचे सासरं आहे. सासरी देखील शेतीभाती सांभाळत तसेच मुलाची जबाबदारी घेत तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा ठरवला. तिच्या या निर्णयाला सगळ्यांनी पाठिंबा दिला. वडिलांनी रिक्षाचालक म्हणून शून्यातून विश्व निर्माण केलेले दिपालीने बघितले होते. तसेच शेतकरी कुटुंबातील सासरचे जीवन अनुभवत होती. यातही आपण सातत्याने अभ्यास केला आणि प्रयत्न केले तर पोस्ट मिळेल हे तिला पक्के ठाऊक होतो. त्यामुळे ती दररोज नित्यनेमाने वाचन करायची, मैदानात देखील सराव करायची, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी माहेरी राहावे लागले नातेवाईक व गावातील वेळप्रसंगी लोकांना तोंड दिले पण तिने हिंमत हरली नाही. त्याचमुळे दिपाली कुटुंबातील पहिली शासकीय अधिकारी ठरली आहे.