झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी राजीनामा दिला आहे. झिंबाब्वेच्या संसदेचे स्पीकर जेकब मुडेंडा ही माहिती दिली आहे.
गेल्या आठवड्यात लष्करानं सत्ता काबीज केल्यानंतर आणि लोकांच्या आंदोलनानंतरही मुगाबे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. उपराष्ट्रपती इमर्सन म्नानगाग्वा यांना दोन आठवड्यापूर्वी पदावरून काढल्यानंतर मुगाबे यांना हटवण्याच्या हालचाली तीव्र झाल्या होत्या. ते स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1980 पासून सतत सत्तेत आहेत. निवडणुकांमध्ये होणाऱ्या हिंसाचारामुळे त्यांची प्रतिमा मलीन झाली होती. मुगाबे यांच्या कार्यकाळात झिंबाब्वेची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. 1980 च्या तुलनेत आता 15 टक्के लोक आणखी गरीब झाले आहेत. या निर्णयामुळे मुगाबे यांच्या पत्नी ग्रेस यांच्यासाठीचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे लष्करात असंतोष निर्माण झाला आहे. लष्करानं सत्ता काबीज करून मुगाबे यांना नजरकैदेत ठेवलं होतं.