तब्बल अकरा वेळा अपयश आले; अखेर बाराव्या प्रयत्नात दिमाखात मिळवली खाकी वर्दी!
गडचिरोली शहरातील इंदिरानगरातील गोविंदसिंग प्रीतमसिंग चव्हाण यांची पोलिस भरतीत वाहनचालक पदावर नियुक्त झाली आहे. या आधी त्याने सीआरपीएफ, एसआरपीएफ, आर्मी, पोलिसच्या अकरा भरत्या दिल्या. बाराव्या प्रयत्नात त्याला यश मिळाले आहे. त्याचा हा प्रवास करणारा प्रवास नक्की वाचा.
गोविंदसिंग अवघा २१ वर्षांचा होता. तेव्हा त्याचे वडील मरण पावले. ते एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करायचे. वडिलांच्या मृत्यूनंतर उत्पन्नाचे साधन बंद झाल्याने संपूर्ण घर चालविणे कठीण होऊ लागले. त्यावेळी २१ वर्ष वय असलेल्या गोविंदसिंगसमोर मजुरी केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. शहरातील एका ठेकेदाराकडे तो नळ फिटिंगच्या कामावर जाऊ लागला. ही अशी परिस्थिती किती दिवस चालणार? यासाठी त्याने सरकारी नोकरीची कास धरली.
गडचिरोली शहरात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सकाळी शारीरिक चाचणीचा सराव, दुपारी मजुरी व सायंकाळी अभ्यास असे नियोजन होते. याच प्रयत्नांच्या जोरावर पोलिस भरती, सीआरपीएफ भरती, एसआरपीएफ भरती व आर्मीच्या भरती देत होता. काही भरत्यांमध्ये तो शारीरिक चाचणी पार करून लेखीपर्यंत पोहोचत होता.
मात्र, दोन ते तीन गुणांनी त्याची नोकरी जात होती. वयाच्या मर्यादेमुळे पुढील पोलिस भरती देण्याची संधी मिळणार की नाही, अशी शंका असल्याने या भरतीसाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करण्याचे ठरवले होते.निवड यादी बघितल्यानंतर त्याच्या पदरी निराशाच येत होती. मात्र, प्रयत्न सोडायचे नाही, हे त्याने ठरविले होते. या भरतीत त्याने जीवतोड़ मेहनत केली. मेहनत फळाला आली व गोविंदसिंगची पोलिस भरतीत निवड झाली.वर्षांपूर्वी त्याने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. या पोलिस भरतीत त्याने वाहन चालक पदासाठी अर्ज केला. यात त्याला चांगले गुण मिळाले व त्याची निवड झाली. गोविंदसिंगचा संघर्ष हा अनेक युवकांना प्रेरणा देणारा आहे.