राज्यसरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात १० हजार १ शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या मेगाभरतीची जाहिरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली.
या जागांपैकी अनुसूचित जातींसाठी १७०४, अनुसूचित जमातींसाठी २१४७, अनुसूचित जमातींसाठी (पेसा) ५२५, व्हिजेएसाठी ४०७, एनटिबीसाठी २४०, एनटीसीसाठी २४०, एनटीडीसाठी १९९, इतर मागास वर्गासाठी- १७१२, इडब्ल्यूएससाठी ५४०, एसबीसीसाठी २०९, एसईबीसीसाठी ११५४ आणि सर्वसाधारण गटासाठी ९२४ जागा उपलब्ध होणार आहेत.
पवित्र पेार्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरुन कमीत कमी त्रुटी राहतील असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. २ मार्च २०१९ रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे, आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.