⁠  ⁠

MPSC च्या दोन परीक्षा पुढे ढकलल्या

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे, लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. लवकरच परीक्षांचे नियोजित वेळापत्रक जाहीर करू असंही पत्रकात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आता वाट पाहावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचारसहिंता लागू झाली आहे. त्यामुळे नियोजित विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणाऱ्या काही परीक्षा पुढे ढकलल्या जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, एमपीएससीकडून आतापर्यंत याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या जाणार की नियोजित वेळेत होणार असा संभ्रम उमेदवारांमध्ये निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांमध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ आणि १९ मे रोजी होणाऱ्या समाज कल्याण अधिकारी गट ब’ आणि ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ परीक्षेचा समावेश आहे.

या परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाईल, असं एमएपीएससीकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांबाबत घोषणा केली जाणार स्पष्ट करण्यात आले आहे.

TAGGED:
Share This Article