मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागातील संतोष ठरला पहिला IAS अधिकारी!
UPSC IAS Success Story : महाराष्ट्रातील बऱ्याच आदिवासी पाड्यातील मुलेमुली ही शिक्षणापासून वंचित आहेत. कित्येकांना हक्काचा आधार नाही की कित्येकांना मार्गदर्शन नाही. पण अचूक मार्गदर्शन आणि शिक्षण दिले तर मुले ही नक्कीच यश गाठू शकतात.हे संतोष सुखदेवे यांनी दाखवून दिले आहे.
धारणी तालुक्यातील नारवाटीसारख्या अत्यंत लहान आदिवासी पाड्यातील मूळ रहिवासी. नारवाटी ते कळमखार असे तीन किलोमीटर अंतर पायी चालत त्याने शिक्षण घेतले. कळमखार शाळेतील शिक्षक गौतम वानखडे यांनी त्याची शिक्षणाप्रतीची आवड आणि चिकाटी पाहून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन केले. संतोषचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नारवाटी येथे झाले.
त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने कळमखार येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येथे पाचव्या वर्गात प्रवेश घेतला. गौतम सरांच्या मार्गदर्शनाखाली संतोषने नवोदय विद्यालयाची परीक्षा दिली व तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याला अमरावती येथील नवसारी परिसरातील जवाहर नवोदय विद्यालयात संतोषला प्रवेश मिळाला आणि येथे त्याने इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी घेण्यासाठी तो पुण्याला गेला. पुणे येथे चार वर्षे त्याने अत्यंत कठीण परिस्थितीत काढले.
अभियांत्रिकीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही त्याची शिक्षणाची भूक संपली नाही. ‘बार्टी’संस्थेकडून दरवर्षी परीक्षा घेऊन ५० होतकरू विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या परीक्षेत संतोष उत्तीर्ण झाला. पुढील कोचिंगसाठी त्याला याच संघटनेने संपूर्ण खर्च पत्करून दिल्लीला पाठविले. दिल्लीत सन २०१५ मध्ये कोचिंग पूर्ण केल्यावर सन २०१६ मध्ये नागरी प्रवेशपूर्व परीक्षा त्याने उत्तीर्ण केली. आता सन २०१६ च्या डिसेंबर महिन्यात त्याने प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली आणि ५४६ व्या क्रमांकाने ती उत्तीर्णदेखील केली.
संतोषचा हा प्रवास वाटतोय तितका सोपा नक्कीच नव्हता. त्याने वेळप्रसंगी दोन जोड कपड्यांवर, मेसमधील जेवण करून दिवस काढले. पण अभ्यास करायचा मात्र सोडला नाही. जिद्दीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षा पण यशस्वीपणे पास झाला. तो मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील पहिला आयएएस अधिकारी ठरला. सध्या जम्मू – काश्मीर मधील कारगिलमध्ये कामकाज बघत आहेत.