UPSC Success Story : गावातील एका साध्या दोन खोल्यांच्या टाइल्सच्या घरात कोणत्याही चैनीच्या वस्तू नसताना देखील जिद्दीने निलेशने अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले…नुसते स्वप्न बघितले नाहीतर तर ते सत्यात साकार झाले. मध्य प्रदेशातील इशपूर या छोट्याशा गावातील रहिवासी असलेला निलेश अहिरवार…निलेशचे वडील रामदास हे गावातच गवंडी काम करतात.
तर आई मोलमजुरी करून कुटुंबाला कामात हातभार लावते. शालेय शिक्षण सरकारी शाळेत झाले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत झाले, नंतर त्यांनी ९वी ते १२वी पर्यंतच्या शिक्षणासाठी तवनगर मॉडेल स्कूलमध्ये प्रवेश घेतला. बारावी नंतर त्यांनी २०२० मध्ये चित्रकूट येथील महात्मा गांधी ग्रामोद्योग विद्यापीठातून कृषी विषयात बी.टेक केले. याच दरम्यान त्याला स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली व त्याने तयारी करायला सुरुवात केली.पण योग्य मार्गदर्शन नसल्याने २०२१ आणि २०२२ मध्ये यूपीएससी प्रिलिम्सही पास करू शकला नाही.तिसऱ्या प्रयत्नात प्रिलिम्स क्रॅक केली.
त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत दोन्ही पास केले. अंतिम निकालात निलेशने यूपीएससीमध्ये ९१६ रँकसह यश संपादन केले. नीलेशने तरुण वयात देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. २४ वर्षीय निलेशची आता संपूर्ण कुटुंबाची हलाखीची परिस्थिती नक्कीच सुधारेल ही आशा आहे.