झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या होतकरू हुसेनने UPSC मध्ये मिळविले यश
UPSC Success Story छोटेसे झोपडपट्टी भागातील घर, आर्थिक परिस्थिती बेताची, वडील कंत्राटी कामगार अशा परिस्थितीमध्ये देखील मुंबईतील डोंगरी येथील मोहम्मद हुसेन सय्यद यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.
हुसैन हा त्याच्या चार भावडांपैकी सर्वात लहान आहे. त्याला दोन मोठे भाऊ आणि एक बहीण आहे. हुसैन अभ्यासात मेहनती होता आणि त्यानं मोठा अधिकारी व्हावं अशी वडीलांची आणि त्याची इच्छा होती. यासाठी जे काही करता येईल. तेवढे कष्ट केले. त्यांनी मुंबईच्या डॉकयार्डमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. हुसैन सय्यद यांनी उमरखाडी येथील सेंट जोसेफ शालेय शिक्षण पूर्ण केले. तर अंजुमन-ए-इस्लाममधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर एलफिंस्टन कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून त्याने पदवी घेतली.
त्याने कॉलेज होईपर्यंत पण कधीही आयएएसबद्दल ऐकले नव्हते; आयएएस अधिकारी म्हणून पाहण्याचे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. त्याचे वडील निरक्षर आहेत तरीही त्यांनी आपल्या चार मुलांपैकी सर्वात लहान मुलांचे स्वप्न पाहण्याचे धाडस केले. त्यानंतर खरी संघर्षमय लढाई सुरू झाली. या स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या काळात हुसैनला चारवेळा अपयश आले. पण हिम्मत न हारता त्यानं आपल्या संघर्षाची लढाई सुरूच ठेवली. अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्याला पाचव्या प्रयत्नात यश मिळाले.
या तरूणाने नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये ५७० रॅंक मिळवून तरूणांसमोर एक आदर्श ठेवला आहे. पण अजून मेहनत घेऊन चांगल्या पदासाठी मेहनत घेणार आहे.