अंगणवाडी सेविकेचा मुलगा सेल्फ स्टडी करून बनला प्रशासकीय अधिकारी!
UPSC Success Story स्पर्धा परीक्षा म्हटलं की महागडे क्लासेस आणि ॲकेडमी लेक्चर या गोष्टींची गरज असते, त्यामुळे परीक्षेत यश मिळते. असा गैरसमज आहे. खरंतर स्वतः अभ्यास करून सेल्फ स्टडीच्या जोरावर देखील यश मिळवता येतं, हे राहुल सांगवान या तरूणाने करून दाखवले आहे. त्याने दररोज सेल्फ स्टडी करून, सात ते आठ तास अभ्यास करून देशातील सर्वात प्रतिष्ठित सेवेत ५०८व्या क्रमांकाने ही युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
राहुल सांगवान हा मूळचा हरियाणातील भिवानी येथील मिताथल गावचा रहिवासी आहे. त्याने आपले शालेय शिक्षण भिवानी येथून पूर्ण केले.त्याच्या शालेय शिक्षणादरम्यान, राहुल नेहमीच गुणवत्ता यादीतील विद्यार्थी राहिला आहे. राहुलने त्याच्या वडिलांच्या शाळेतच शिक्षण घेतले. तो नेहमीच हुशार होता. त्याने 8वीच्या परीक्षेत ९६% आणि दहावीच्या परीक्षेत ९८% गुण मिळाले.बारावीच्या परीक्षेतही ९७% गुण मिळवून त्याने गुणवत्तात यादीतील नाव कायम ठेवले.त्याने श्री राम वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, बाँड येथून बारावीचे शिक्षण घेतले. नंतर सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने चौधरी बन्सीलाल विद्यापीठातून एम.ए पूर्ण केले.
राहुल सांगवानची आई उर्मिला अंगणवाडी सेविका आहेत, तर वडील नीर गावातच दहावीपर्यंत शाळा चालवून मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. आपले ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थी खूप मेहनत करतात आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करतात. अशीच ही प्रेरणादायी गोष्ट आहे. त्याला लहानपणापासूनच लोकांची सेवा करण्यासाठी युपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे होते.या क्षेत्राचे त्याला विशेष आकर्षण होते. त्यामुळे, तो घरच्या घरी दररोज नित्यनेमाने वाचन आणि लेखन करायचा. सुरुवातीला त्याने राज्यस्तरीय परीक्षांवर लक्ष केंद्रित केलं.
तसेच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करत राहिला. कधी त्या अपयश आले तरी पुन्हा कुठे चूक होऊ नये म्हणून शोधत नव्याने अभ्यासासोबत एकनिष्ठ होऊन तयारी करायचा. अखेर, त्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्याने ५०८व्या क्रमांकाने ही युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तो आय.ए.एस अधिकारी झाला.