विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रसाद लाड हे अपेक्षेपेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाले. प्रसाद लाड यांना २०९ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप माने यांना केवळ ७३ मतांवर समाधान मानावे लागले. दोन मते बाद झाली.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी गुरुवारी मतदान झाले. भाजपच्या वतीने प्रसाद लाड निवडणुकीच्या रिंगणात होते, तर काँग्रेसने दिलीप माने यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते.
भाजपा-शिवसेना युतीकडे पुढीलप्रमाणे मते होती. भाजपा १२२, शिवसेना ६३ आणि अपक्ष ७. युतीच्या एकूण मतांची संख्या १९२ होती. मात्र प्रत्यक्षात लाड यांना २०९ मते मिळाली. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे काँग्रेस – ४२, राष्ट्रवादी काँग्रेस ४१ अशी ८३ मते होती. मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ ७३ मते मिळाली. त्यात काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आणि नितेश राणे यांनी भाजपाला उघडपणे मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. दोन मते बाद ठरली आहेत. एमआयएमने या मतदानावर बहिष्कार घातला होता.