एसबीआयने ऑस्ट्रेलियात सुरू केली शाखा
भारतीय स्टेट बँकेनं(एसबीआय) मेलबर्नमध्ये आपली शाखा उघडली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये शाखा उघडणारी एसबीआय भारतातील पहिलीच बँक ठरली आहे. सोमवारी एका भव्य कार्यक्रमात व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्नमध्ये शाखेचा उद्धघाटन सोहळा पार पडला. व्हिक्टोरियामध्ये याआधी सिप्ला, सायरेन्ट, एचसीएल, इन्फोसिस, रॅमको, टीसीएस, महिंद्रा आणि झोमॅटो या भारतीय कंपनी कार्यरत आहेत.
व्हिक्टोरिया आणि भारतामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध सुधारण्यास आमचं हे पाऊल भविष्यात मदत करेल, पुढील दहा वर्षांमध्ये याचा फायदा दिसून येईल, असे बँकेकडून सांगण्यात आले.
मलिहा लोधींची संयुक्त राष्ट्रातून हकालपट्टी
संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी आता मुनीर अक्रम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुनीर अक्रम यांनी यापूर्वी 2002 ते 2008 दरम्यान या पदावर आपली जबाबदारी पार पाडली आहे. न्यूयॉर्क येथील मुख्यालयात ते कार्यरत असतील.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नियुक्त्या केल्या आहेत. राजदूत मुनीर अक्रम यांच्या व्यतिरिक्त पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अन्य नियुक्त्यांचीदेखील घोषणा केली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीन नव्या राजदुतांचीही नियुक्ती केली आहे. मोहम्मद एजाझ यांना हंगेरीचे तर सय्यद सज्जाद हैदर यांना कुवैतचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पॅलेस्टाइनमध्ये महात्मा गांधीवर पोस्टाचे तिकीट
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत पॅलेस्टाइन देशाने काल (मंगळवार) महात्मा गांधी यांचा वारसा आणि मूल्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध केले. फिलिस्टाइन अथॉरिटीच्या (पीए) दूरसंचार आणि माहिती विभागाचे मंत्री इसहाक सेदेर यांनी मंत्रालयात आयोजित एका कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधी सुनील कुमार यांच्या उपस्थितीत हे पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध केले.
एमसीसी अध्यक्षपदी संगकारा
ऐतिहासिक मेरलिबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) अध्यक्षपदाची सुत्रे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने स्वीकारली आहेत. या मानाच्या क्लबमध्ये अध्यक्ष होणारा संगकारा हा पहिला ब्रिटिशेतर खेळाडू ठरला आहे.
गेल्या मे महिन्यातच मावळते अध्यक्ष अँथनी रेफर्ड यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत संगकाराच्या नावाची घोषणा केली होती.
१३४ कसोटींमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ४१ वर्षांच्या संगकाराचे एमसीसी क्लबशी असलेले नाते जुनेच आहे. २००२मध्ये इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना या क्लबविरुद्ध खेळला. तो प्रथम श्रेणीचा सामना चेस्टफील्ड, क्वीन्स पार्क येथे पार पडला होता.