पुढील वर्षी ‘इस्रो’ करणार अंतराळात एक नवा प्रयोग
इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेनंतर आता इस्रोने पुन्हा एकदा अंतराळ संशोधनात आपली छाप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा एक कठिण मोहीम इस्रो हाती घेणार आहे. काही महिन्यांपूर्वीच इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी अंतराळात भारत आपले स्पेश स्टेशन उभारणार असल्याचं म्हटलं होतं. स्पेश स्टेशन उभारण्यापूर्वी अवकाशयान किंवा उपग्रहांना एकत्रित जोडण्याचं महत्त्वाचं काम इस्रोला पूर्ण करावं लागणार आहे. ही मोहीम अत्यंत गुंतागुंतीची आणि कठिण असल्याचं म्हटलं जात आहे.
“ही मोहिम सुरू करण्याचा अर्थ इस्रोच्या स्पेस स्टेशन मोहिमेची सुरूवात झाली असं होत नाही. गगनयान मोहिमेनंतरच डिसेंबर 2021 मध्ये स्पेस स्टेशन मोहिम हाती घेतली जाणार आहे. अंतराळात मानवाला पाठवणं आणि डॉकिंगमध्ये यश मिळाल्यानंतरच स्पेश स्टेशन मिशनची सुरूवात करणार असल्याचे” सिवन यांनी स्पष्ट केलं.
राजस्थानातील तीन रेल्वे स्थानके स्वच्छतेबाबत देशात सर्वोत्कृष्ट
रेल्वेच्या स्वच्छता सर्वेक्षणात राजस्थानमधील तीन रेल्वे स्थानकांनी स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मान मिळवला. उपनगरीय स्थानकांमध्ये हा मान मिळवणाऱ्यांत मुंबईतील ३ स्थानके आहेत.
रेल्वेच्या देशभरातील ७२० स्थानकांपैकी जयपूर, जोधपूर व दुर्गापुरा या तीन स्थानकांनी यादीत पहिल्या तीन क्रमांकांवरील स्थान पटकावले. १०९ उपनगरीय स्थानकांपैकी मुंबईतील अंधेरी, विरार व नायगाव ही तीन स्थानके पहिल्या तीन क्रमांकांची ठरली.
रेल्वेचा विभागनिहाय विचार करता, उत्तर पश्चिम रेल्वेने पहिला क्रमांक मिळवला. त्याखालोखाल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वे यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक आहे.
२०१६ सालापासून रेल्वे देशभरातील ४०७ महत्त्वाच्या स्थानकांच्या स्वच्छतेबाबत तटस्थ यंत्रणेकडून अंकेक्षण करून त्यांची क्रमवारी जाहीर करत असते. या वर्षी याचा ७२० स्थानकांपर्यंत विस्तार करण्यात येऊन पहिल्यांदाच उपनगरीय स्थानकांचाही समावेश करण्यात आला.
स्वच्छतेच्या व्याप्तीत २०१४ मधील ३८ टक्क्यांच्या तुलनेत ९८ टक्के वाढ
भारतातील स्वच्छतेच्या व्याप्तीत २०१४ मधील ३८ टक्क्यांच्या तुलनेत ९८ टक्के वाढ झाल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी भारताचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे हे यश असून त्याची दाखल आता जागतीक स्तरावरही घेण्यात आली आहे.
स्वच्छ भारत उपक्रमामुळे स्वच्छतेच्या व्याप्तीत २०१४ मधील ३८ टक्क्यांच्या तुलनेत आता ९८ टक्के वाढ झाली आहे.
एसईक्यूआयनुसार, देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९५ टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे आहेत. २०१६-१७ च्या अहवालानुसार आसाम आणि मेघालयमध्ये अनुक्रमे ८३.४० आणि ८४.१० टक्के सर्वात कमी प्रमाणावर मुलींसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध होती. दरम्यान, बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मागील वर्षाच्या तुलनेत समान माहिती नोंदविली तर सिक्कीम आणि नागालँडमध्ये घट नोंदली गेली.
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा : ब्रिटनच्या अॅशरने सुवर्णपदकांचा दुष्काळ संपवला
ब्रिटनची महिला धावपटू दिना अॅशर-स्मिथने बुधवारी मध्यरात्री जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. देशाला २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून देणारी ती पहिलीच धावपटू ठरली आहे.
खलिफा स्टेडियमवर झालेल्या या शर्यतीत २३ वर्षीय अॅशर-स्मिथने २०० मी. अंतर २१.८८ सेकंदांत गाठले. गेल्या ३६ वर्षांत ब्रिटनच्या एकाही महिला धावपटूला जागतिक स्पर्धेतील १०० अथवा २०० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकता आलेले नव्हते, परंतु अॅशर-स्मिथने हा पराक्रम करण्याची किमया साधली.
कुस्ती प्रशिक्षक करिमी यांची हकालपट्टी
भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) राष्ट्रीय प्रशिक्षक हुसेन करिमी यांची कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने आधीच हकालपट्टी केली आहे.
फ्रीस्टाइल प्रकारासाठी असलेले प्रशिक्षक करिमी यांचा कार्यकाळ टोक्यो ऑलिम्पिकनंतर संपुष्टात येणार होता. मात्र त्यांना पदावरून काढून टाकल्याची नोटीस पाठवण्यात आली आहे