आंध्र प्रदेशला राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१७-१८’ या समारंभात पर्यटनविषयक सर्वांगीण विकासासाठी आंध्र प्रदेशला सर्वोत्कृष्ट राज्याचे पारितोषिक नायडू यांच्या हस्ते देण्यात आले.
यंदा विविध विभागांमध्ये ७६ पुरस्कार देण्यात आले आहेत. साहसी पर्यटन विभागात गोवा आणि मध्य प्रदेश विभागून विजेते ठरले, तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रमोशन फ्रेंडली राज्याचा पुरस्कार उत्तराखंडला मिळाला. आयटीचा नावीन्यपूर्ण वापर करण्यासाठीचा सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार तेलंगणाला मिळाला. ‘आयटीडीसी’च्या हॉटेल अशोकने बैठकीसाठीचे उत्कृष्ट ठिकाण म्हणून पुरस्कार पटकावला.
केंद्र सरकार देणार ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार’
देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी हातभार लावणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावे ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
पदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. अत्यंत पात्र व्यक्तीलाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीला हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येणार नसल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले आहे.
पुरस्कार विजेत्याला रोख रक्कम दिली जाणर नसून वर्षभरात तीनपेक्षा जास्त लोकांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नौदलाची क्षमता दुपटीनं वाढली; ‘आयएनएस खांदेरी’ नौदलाच्या ताफ्यात दाखल
संपूर्ण भारतीय बनावटीच्या, अद्ययावत अशी ‘आय.एन.एस. खांदेरी’ ही पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते ही पाणबुडी देशसेवेत रूजू करण्यात आली. पाणबुडीच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. कलवरी श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी असून डिझेल-विद्युत प्रकारातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे.
कलवरी श्रेणीतील सहा पाणबुडय़ा बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत ही दुसरी पाणबुडी नौदलात दाखल झाली आहे. या पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकने केली आहे.
अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापराने मनुष्यबळ निम्म्यावर
- ३६० बॅटरींचा वापर (प्रत्येकी ७५० किलो वजन)
- पर्मासिन मोटरच्या वापरामुळे आवाजच नाही
- ४ पाणतीर (टॉर्पेडो), २ क्षेपणास्त्रे डागण्याची यंत्रणा
- ताशी २० नॉटिकल मैल वेगाने जाण्याची क्षमता