मुलाखत देताना…
नोकरी संपादन करण्याच्या प्रक्रियेत मुलाखतीला सामोरे जावे लागते. आत्मविश्वासाने मुलाखत देताना कोणती पथ्ये पाळावीत आणि कुठली कौशल्ये आत्मसात करावीत, याविषयी…
तुमची शैक्षणिक कारकीर्द उत्तम असली तरीही नोकरी संपादन करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या मुलाखतीची तयारी ही तुम्हाला करावीच लागते. मुलाखत देणे हे शिकता येण्याजोगे कौशल्य आहे आणि ‘फर्स्ट इम्प्रेशन’ची छाप उमटण्याकरता तुम्हाला मुलाखतीत दुसरी संधी मिळत नसते. म्हणूनच मुलाखतीला जाताना काही पथ्ये बाळगणे आणि काही कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे.
० देहबोली : मुलाखतीच्या वेळेस मुलाखतकाराचे तुमच्या बोलण्याकडे तर लक्ष असतेच. मात्र बोलण्याच्या पलीकडे तुमच्या देहबोलीतून संवाद साधला जात असतो. त्याकडेही मुलाखतकाराचे बारीक लक्ष असते. सरळ उभे राहणे, नजरभेट होणे, आत्मविश्वासपूर्वक हस्तांदोलन करणे अशा सुरुवातीच्या अनेक छोटय़ा- छोटय़ा गोष्टींनी मुलाखतीच्या वेळेस तुमचे व्यक्तिमत्त्व जोखले जाते.
० ड्रेसकोड : आज कामाच्या ठिकाणी सर्रासपणे वापरले जाणारे कॅज्युअल पेहराव मुलाखतीच्या वेळेस वापरणे योग्य नव्हे. मुलाखतीच्या वेळेस तुम्ही काय परिधान करता आणि किती नीटनेटके असता, याला त्या त्या कंपनीतील संस्कृतीनुसार महत्त्व दिले जाते. शक्य असल्यास, मुलाखतीच्या आधी कंपनीचा ड्रेसकोड काय आहे, हे लक्षात घ्या.
० लक्षपूर्वक ऐकणे : मुलाखतीच्या प्रारंभापासूनच, मुलाखतकार बोलताना तुम्हाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कुठली माहिती देतो हे काळजीपूर्वक ऐकावे. जर तुम्ही ऐकण्यात गाफील राहिलात, तर कदाचित एखादी अमोघ संधी तुम्ही वाया घालवाल. उत्तम श्रोता असणं म्हणजे तुम्ही काळजीपूर्वक ऐकणं आणि तुम्ही ऐकत आहात, हे बोलणाऱ्याला समजणं. तुमच्या मुलाखतकाराचं निरीक्षण करा आणि त्याची बोलण्याची शैली आणि बोलण्याचा वेग लक्षात घेत त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा.
प्रश्नांना उत्तरे देताना घ्यावयाची काळजी
जेव्हा मुलाखतकार तुमच्या कारकिर्दीबद्दल तुम्हांला प्रश्न विचारत असतो, तेव्हा तो प्रश्न वर्तनासंबंधित प्रश्न असतो. या प्रश्नाच्या निमित्ताने तुम्ही त्या भूमिकेत वा प्रसंगात कसे वागला होतात, अशी विचारणा करण्याचा समोरच्याचा हेतू असतो. अशा वेळी तुम्ही नेमके उदाहरण दिले नाहीत, तर तुम्ही केवळ प्रश्नाचे उत्तर देत नाही तर तुमची क्षमता आणि कौशल्य सिद्ध करण्याची संधी गमावून बसता.
० खूप बोलू नका : मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीशी आवश्यकतेपेक्षा अधिक बोलत राहणे ही एक घोडचूक ठरू शकते. विचारलेल्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे दिली नाही, तर पाल्हाळिक बोलण्यात खूप वेळ जातो आणि महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरे देणे राहून जाते. त्यामुळे कुठल्या पदाच्या मुलाखतीसाठी तुम्ही आला आहात, हे लक्षात ठेवून त्यानुसार त्या पदाला आवश्यक ठरणारी कौशल्ये तुम्ही आत्मसात केली आहेत, हे तुमच्या मुलाखतीतून स्पष्ट होणे याकडे तुमचा कटाक्ष असायला हवा.
० व्यक्तिगत गप्पा नको : मुलाखत ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित अशी निखळ व्यावसायिक बाब आहे. नव्या व्यक्तींशी ओळख होणे वा मैत्री करणे हा मुलाखतीचा हेतू नसतो. त्यामुळे अघळपघळ बोलणे, व्यक्तिगत संदर्भ देणे टाळावे. व्यक्तिगत गप्पा मारू नयेत. मुलाखत देताना कामाप्रती तुमची ऊर्जा आणि उत्साह दिसायला हवा. मुलाखतीच्या वेळेस तुमच्या मनात येणाऱ्या शंकाही जरूर विचाराव्यात. मात्र तुम्ही नोकरी संपादन करण्यासाठी आलेले उमेदवार आहात, हे विसरू नका.
० योग्य भाषेचा वापर : मुलाखतीच्या वेळेस व्यावसायिक भाषेचा अवलंब करणे आवश्यक आहे. बोलण्याच्या ओघात असंसदीय भाषा वापरणे अथवा वय, जात, धर्म, राजकारण अथवा लिंगनिहाय भाष्य करणे अयोग्य ठरते. असे भाष्य केल्याने तुम्हाला परतीचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
० प्रश्न विचारा : तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का, असे जर मुलाखतीच्या पॅनेलने विचारल्यानंतर बहुतांश उमेदवार ‘नाही’ असे उत्तर देतात. हे उत्तर चुकीचे आहे. योग्य पद्धतीने मुलाखत देताना प्रश्न विचारल्याने कंपनीतील उपक्रमांविषयी तुम्हाला स्वारस्य कसे आहे, हे मुलाखतकाराला जाणून घेता येते. तुमच्या मुलाखतीदरम्यान तुम्हाला विचारल्या गेलेल्या प्रश्नांमधूनच तुमच्या मनात हे प्रश्न उभे राहतात. त्याविषयी अधिक माहिती जरूर विचारावी.
तुमच्या बोलण्यातून अथवा देहबोलीतून ‘कृपया.. कृपया.. मला नोकरीत घ्या..’ अशी अगतिकता दिसून येणे म्हणजे तुमचा आत्मविश्वास कमकुवत आहे, हे दिसून येणे. त्यामुळे मुलाखतीच्या वेळेस तुमचा वावर सहज असायला हवा. तुम्ही शांत असायला हवात आणि तुमच्यातील आत्मविश्वासही समोरच्याला दिसायला हवा. तुम्हाला ठाऊक असते की तुम्ही ही नोकरी करू शकता. मुलाखतकाराला ही गोष्ट पटायला हवी, याची दक्षता तुम्ही मुलाखत देताना घ्यायला हवी.
(योगिता माणगांवकर यांचा हा लेख दैनिक लोकसत्ताच्या ‘करिअर वृत्तांत’ या सदरात प्रकाशित झाला आहे.)
भाऊ तुम्ही फार कमी वेळात हे वेब साईड प्रगती शील केली हे पाहून बर वाटले …………..
तुषारजी तुम्ही फार कमी वेळात हि वेब साईड फार वेवस्तीतपणे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केले .फार छान वाटले ….