स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत आयोजित CRPF, CISF, BSF, ITBP आणि SSB मधील GD कॉन्स्टेबलच्या भरती परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मध्ये कॉन्स्टेबल (GD) ची भरती परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल. ही परीक्षा 20 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024 या कालावधीत देशभरातील 128 शहरांमधील सुमारे 48 लाख उमेदवारांसाठी घेतली जाईल.
गृह मंत्रालयाने 01 जानेवारी 2024 पासून हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आता आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, उडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी या भाषांमध्ये असतील. कॉन्स्टेबल (GD) निवड परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे घेतलेल्या प्रमुख परीक्षांपैकी एक आहे, जी देशभरातील लाखो तरुणांना आकर्षित करते.
या ऐतिहासिक निर्णयामुळे देशभरातील लाखो तरुणांना त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेत या परीक्षेत सहभागी होता येईल, ज्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल. केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे देशभरातील तरुणांना त्यांच्या मातृभाषेत सीएपीएफ कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षेत सहभागी होऊन देशसेवेत करिअर करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.