महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणी पुरवठा व स्वच्छता आणि मृद व जलसंधारण विभागातील राजपत्रित गट-अ व गट- ब संवर्गातील भरतीकरीता आयोगाकडून सन २०२० पर्यंत अनुक्रमे महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत होती.
तसेच सदर संवर्गांच्या परीक्षेकरीता उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज मागविण्यात येवून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जात होते. प्रस्तुत तीनही परीक्षांच्या आयोजनासंदर्भातील विविध पैलूंचा विचार करून तीनही संवर्गातील भरतीकरीता यापुढे ” महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ” या नावाने एकाच संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.
२. संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून, अर्ज करणा-या उमेदवारांकडून ते यापैकी एक, दोन किंवा तीनही परीक्षांकरीता बसू इच्छितात काय, याबाबत विकल्प घेण्यात येईल. संबंधित परीक्षेकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित संवर्गातील पद भरतीकरीता अर्ज समजण्यात येईल / येतील व त्या आधारे, तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरीता पूर्व परीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील.
३. पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गाकरीता आयोगाकडून विहीत करण्यात आलेल्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जातील.
४. प्रस्तुत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अर्हता, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादीबाबतचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
५. वरील बदल सन २०२१ मध्ये प्रसिद्ध होणा-या जाहिरातीपासून लागू ( होईल.