⁠  ⁠

Current Affair 02 January 2019

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

भारताशी संबंध सुधारण्याबाबत कायद्यावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

  • भारताशी संबंध सुधारण्याबाबत कायद्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांच्या आर्थिक, व्यूहात्मक आणि संरक्षणविषयक संबंधांना कायद्याचे कोंदण लाभले आहे. त्यातून चीनच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्याचा अमेरिकेचा हेतू आहे.
  • चीनने संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगत गेल्या काही वर्षांत त्या प्रदेशातील कारवाया वाढवल्या आहेत. त्यामुळे सागरी सीमांविषयक नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. चीनच्या या कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिकेने भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या सहकार्याने नवी आघाडी उघडली आहे.
  • एशिया रिअ‍ॅश्युरन्स इनिशिएटिव्ह अ‍ॅक्ट नावाचा कायदा ट्रम्प यांनी संमत केला असून त्याच्या कलम २०४ अनुसार भारत आणि अमेरिकेमध्ये सहकार्य वाढीस लागण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
  • अमेरिकेचे सिनेटर कॉरी गार्डनर एड मार्के यांनी हे विधेयक मांडले होते. आता ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी केली असून त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संरक्षण सहकार्य वाढीस लागणार आहे.

आण्विक आस्थापनांच्या याद्यांचे हस्तांतरण

  • पाकिस्तान आणि भारत या देशांनी आपापल्या आण्विक आस्थापनांच्या याद्यांची देवाणघेवाण केली. भारत व पाकिस्तान यांच्यात ३१ डिसेंबर १९८८ रोजी आण्विक आस्थापना व सुविधा हल्ला प्रतिबंधक करार झाला होता. त्यानुसार दोन्ही देशांनी याद्यांची देवाणघेवाण केली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
  • भारत व पाकिस्तान यांच्यात आण्विक ३१ डिसेंबर १९८८ रोजी कैदी व आण्विक आस्थापने यांच्या याद्यांची देवाणघेवाण करण्याचा करार झाला होता. त्या कराराची अंमलबजावणी दोन्ही देशांनी २७ जानेवारी १९९१ रोजी केली होती.
  • त्यानुसार दर वर्षी एक जानेवारीला आण्विक आस्थापने व सुविधांच्या याद्यांची देवाणघेवाण केली जाते. १ जानेवारी १९९२ पासून या याद्यांची देवाणघेवाण सातत्याने होत आहे. दोन्ही देशांतील व्दिपक्षीय संबंध खालावलेले असतानाही या प्रक्रियेत खंड पडलेला नाही.

‘नासा’च्या यानाची सूर्यमालेला गवसणी

  • ‘नासा’च्या ‘न्यू होरायझन’ या यानाने अवकाश प्रवासातील सर्व विक्रम मागे टाकले असून, या यानाने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ऐतिहासिक ‘अल्टिमा थुले’ हा टप्पाही पार केला आहे. अवकाश मोहिमांमधील हा सर्वांत लांबचा पल्ला असून, अतिशय गूढ मानल्या जाणाऱ्या लघुग्रहाच्या कुपर पट्ट्यांपर्यंतचा हा प्रवास आहे.
  • जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील ‘अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी’च्या माध्यमातून ‘नासा’ या यानाचे काम पूर्ण करत आहे. ‘न्यू होरायझनने काही क्षणांपूर्वीच अल्टिमा थुलेला मागे टाकले आहे. पुन्हा एकदा आपण इतिहास घडवला आहे,’ असे ट्विट करून या कामगिरीची घोषणा करण्यात आली.
  • ‘अल्टिमा थुले’चा अर्थ ज्ञात जगाच्या पलिकडचे असा होतो. हे ठिकाण सूर्यापासून ६.५ अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. नेपच्युन ग्रहाच्या पुढे असणाऱ्या लघुग्रहांच्या कुपर पट्ट्यामध्ये हा लघुग्रह आहे. नियोजित वेळेप्रमाणे सकाळी अकरा वाजता हे यान अल्टिमा थुलेपासून पुढे सरकणार होते. त्यानंतर एका तासाने तेथून पाठविलेला संदेश आणि छायाचित्रांची मालिका पृथ्वीवर मिळाली.
  • न्यू होरायझन या यानाचे २००६मध्ये प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यानुसार, या यानाने २०१५मध्ये प्लुटोभोवती सहा महिने फिरत निरीक्षणे नोंदवली आहेत.
  • ‘हबल’ दुर्बिणीने २०१४मध्ये केलेल्या निरीक्षणानुसार, उपलब्ध इंधनामध्ये हे यान ‘अल्टिमा थुले’पर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
Share This Article