इराणवरील तेलनिर्यात निर्बंध आजपासून
- अमेरिकेने इराणवर लादलेले तेलनिर्यात निर्बंध आजपासून (सोमवार, दि. ५ नोव्हेंबर, ४ नोव्हेंबरची मध्यरात्र) लागू होत असून त्यातून भारतासह ८ देशांना सहा महिन्यासांठी सवलत मिळाली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिवाळीच्या तोंडावर बसणारा धक्का तूर्तास टळला आहे. दरम्यान, इराणकडून मिळणाऱ्या खनिज तेलाचे पैसे भागवण्यासाठी नवी यंत्रणा तयार करण्यावर सध्या भारताचा भर आहे.
- अमेरिकेने युरोपीय देशांच्या मदतीने २०१५ साली इराणबरोबर अणुकरार केला होता. त्यात इराणने अण्वस्त्रनिर्मिती थांबवण्याचे मान्य केले आणि अमेरिकेने इराणच्या व्यापाराचे दरवाजे खुले केले. मात्र इराण या कराराच्या अटी पाळत नसल्याचा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली. तसेच इराणवर नव्याने निर्बंध लादले. त्यानुसार इराणकडून खनिज तेल विकत घेणाऱ्या देशांवरही अमेरिकेने निर्बंध लादण्याचा इशारा दिला. तेलनिर्यातीतून मिळालेल्या पैशाचा इराणने अण्वस्त्रनिर्मितीसाठी वापर करू नये हा अमेरिकेचा उद्देश आहे. मात्र त्याबरोबर मित्र देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसू नये, याकडेही लक्ष दिले आहे. इराणकडून खनिज तेल आयात करण्यावरील निर्बंध ५ नोव्हेंबरपासून लागू होत आहेत.

एसटीत ६,९४९ चालक-वाहकांची भरती
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) येत्या वर्षांत सहा हजार ९४९ चालक-वाहकांची भरती केली जाणार आहे. यासाठी या नोव्हेंबरअखेरीस जाहिरात काढली जाईल, अशी माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. याशिवाय वर्ग-३ मधील ६७१ जागाही भरल्या जाणार आहेत.
- जाहिरात काढल्यानंतर अर्ज स्वीकारणी व अन्य प्रक्रिया पार पाडल्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात येतील. एसटी महामंडळात १८ हजार बसगाडय़ा व एक लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये जवळपास ३८ हजार चालक व ३४ हजार वाहक आहेत. मात्र वर्षांला निवृत्त होणारे कर्मचारी, कामाची वाढलेली व्याप्ती, बसगाडय़ांची व फेऱ्यांची संख्या पाहता मोठय़ा संख्येने चालक-वाहकांची गरज आहे. गेल्या वर्षी एसटी महामंडळाने मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या कोकण प्रदेशासाठी सात हजार ९०० चालक-वाहकांची भरती प्रकिया सुरू केली. जवळपास पाच हजार जागा भरल्या गेल्या. उर्वरित पदांवर किरकोळ कारणांमुळे निवड न होऊ शकल्याने एसटी महामंडळाने पुन्हा निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे.
- महामंडळाने पाच महिन्यांपूर्वी तीन हजार ५४ चालक-वाहक पदे भरण्याची घोषणाही केली. मात्र, ही पदे भरण्याची प्रक्रिया काही कारणास्तव थांबली. आता महामंडळाने कोकण सोडता राज्यातील अन्य भागांसाठी चालक-वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरअखेरीस याची जाहिरात, त्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारीत परीक्षा व अन्य प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत.
स्वाक्षरीयुक्त ‘सातबारा’त अहमदनगर आघाडीवर:
- सातबारा संगणकीकरण प्रकल्पांतर्गत महसूल विभागाच्या वतीने डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपक्रम सुरू झाला असून अहमदनगर जिल्हा त्यात आघाडीवर आहे.
- पुणे सातव्या क्रमांकावर तर मुंबईसह सिंधूदूर्ग व रत्नागिरी जिल्हा पिछाडीवर आहे. राज्यात आतापर्यंत 39 लाख 24 हजार 648 डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उताऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.
- सातबारा संगणकीकरणात चावडी वाचन, सातबारा दुरुस्ती, पुनर्लेखन, आॅनलाइन सातबारा आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा असे विविध टप्पे आहेत. Digital Ahemadnagar
- तर त्यातच संगणकीकरणाच्या प्रक्रियेत काही चुका झाल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाने राज्यातील सर्व जमीनधारक व शेतकर्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत चुका दुरूस्त करून घेण्याची संधी दिली आहे.
- परिणामत: डिजिटल स्वाक्षरीच्या कामाने अद्याप वेग घेतलेला नाही. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 5 लाख 5 हजार 594 सातबारा उतारे तयार झाले असल्याचे सांगण्यात आले आहेत.

झहीर खानची मुंबई इंडियन्सच्या गोलंदाज मार्गदर्शक पदावर नेमणूक?
- श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने 2019 साली होणाऱ्या आयपीएल लिलावासाठी आपलं नाव यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खान मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून काम पाहण्याची शक्यता आहे.
- याआधी झहीर खानने 3 वर्ष मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यानंतर झहीर दिल्ली संघाकडून आयपीएल खेळला. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लसिथ मलिंगाने आगामी आयपीएल हंगामात खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर, झहीर खानला गोलंदाज मार्गदर्शक म्हणून काम करण्याबद्दल विचारण्यात आलं होतं, आणि झहीर खाननेही याला होकार कळवल्याचं समजतंय.
- मलिंगाने नुकतचं श्रीलंकेच्या संघात पुनरागमन केलं आहे. 2019 साली होणारं आयपीएल हे दक्षिण आफ्रिकेत खेळवलं जाण्याची शक्यता आहे.
नियमित अपडेट मिळवण्यासाठी ‘मिशन एमपीएससी’ला फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.