Current Affairs 02 April 2020
‘पीएनबी’ झाली सर्वांत मोठी दुसरी बँक
पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) स्वतःत युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स यांचे एकत्रीकरण पूर्ण केले असून या दोन्ही बँकांच्या शाखा बुधवारपासून पीएनबीच्या शाखा म्हणून कार्यरत झाल्या आहेत. या तिन्ही बँकांचे एकत्रीकरण बुधवारी पूर्ण झाले. ही बँक आता देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक म्हणून उदयाला आली आहे.
या एकत्रीकरणानंतर पीएनबी आता देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक झाली आहे. या एकत्रीकरणानंतर पीएनबी २.० या रूपात एक अत्याधुनिक आणि आजच्या काळाची बँक म्हणून उदयाला आली असल्याचा दावा बँकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केला आहे. पीएनबी २.० स्वरूपातील बँकेने नव्या शाखांसह सर्व शाखांतून आंतर-कामाकाजासाठी अद्ययावत सेवा देऊ केली आहे. यामध्ये मोबाइल व इंटरनेट बँकिंग यांचाही समावेश आहे.
एकत्रीकरणानंतर नव्या पीएनबी बँकेकडे ११ हजारहून अधिक शाखा तसेच १३ हजारहून अधिक एटीएम झाले आहेत. बँकेकडे आता एक लाख कर्मचारी झाले असून बँकेचा एकूण मिश्र व्यवसाय १८ लाख कोटींवर गेला आहे.
क्रिकेटला DLS नियम देणाऱ्या टोनी लुईस यांचे निधन!
क्रिकेटमध्ये एखाद्या सामन्यात पाऊस किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमुळे अडथळा आला आणि त्यामुळे जर वेळ वाया गेला तर सामन्याचा निकाल लावण्यासाठी एका नियमाचा वापर केला जातो. डकवर्थ-लुईस या नावाने ओळखळ्या जाणाऱ्या नियमावर अनेक क्रिकेट चाहते नाराज असतात. कारण यामुळे अनेकदा चित्र-विचित्र असे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघाला मिळते. या नियमाचा ज्यांनी शोध लावला त्यापैकी एक टोनी लुईस यांचे निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते.
गणिततज्ञ टोनी लुईस यांनी फ्रँक डकवर्थ यांच्यासह मिळून क्रिकेट सामन्यांचा निकाल लावता यावा याासाठी एक नियम तयार केला होता. पावसामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे जर सामन्यात अडथळा आला तर विरुद्ध संघाला किती धावांचे लक्ष्य द्यायचे याचा नियम तयार करणे गरजेचे होते. लुईस आणि डकवर्थ यांनी १९९७ मध्ये एक फॉर्म्युला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सादर केला. नंतर १९९९ मध्ये याचा वापर इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये करण्यात आला.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बुधवारी एक निवेदन प्रसिद्ध केले. ईसीबीला टोनी लुईस यांच्या निधनाबद्दल दु:ख आहे. त्यांनी डकवर्थ यांच्यासह मिळून क्रिकेटला डकवर्थ-लुईस हा नियम दिला.