रासायनिक, जैविक, आण्विक हल्ल्यांचे स्वरूप
ओळखणे आता सोपे
- रासायनिक, जैविक, किरणोत्सारी अथवा आण्विक (सीबीआरएन) हल्ला झालाच तर धोकादायक क्षेत्रातील नमुना संकलन आणि परीक्षण करून त्या हल्ल्याचे स्वरूप स्पष्ट करण्यास साहाय्यभूत ठरणारी ‘मानवरहित सूचक यंत्रणा’ संरक्षण संशोधन आणि विकास प्रतिष्ठानच्या (डीआरडीओ) अहमदनगर येथील प्रयोगशाळेने विकसित केली आहे.
- स्वदेशी बनावटीच्या या यंत्रणेमुळे जवानांना जीव धोक्यात घालावा लागणार नाही. ‘रिमोट कंट्रोल’च्या साहाय्याने ही यंत्रणा नियंत्रित करता येते. प्रत्येक घडामोडीची माहिती ती ऑनलाइन नियंत्रण कक्षाला पुरवते. या यंत्रणेद्वारे हल्ल्याचे स्वरूप समजले की, उपाय योजण्याचे काम तातडीने सुरू करता येते. या प्रणालीचा लष्करी गरजेनुसार अन्य कामांसाठी वापर करता येईल, असे संशोधन अधिकाऱ्यांनी सांगितले.
- अहमदनगरच्या वाहने संशोधन आणि विकास केंद्राने (व्हीआरडीई) जमिनीवर प्रभावीपणे काम करण्याची क्षमता असणारी छोटेखानी सूचक (सीबीआरएन यूजीव्ही) यंत्रणा तयार केली आहे.
भारतातील साखर अनुदानाविरोधात ब्राझीलचीही तक्रार
- भारताने ऊस उत्पादक शेतक ऱ्यांना अनुदाने दिल्याने जागतिक पातळीवर साखरेच्या किमती पडल्या असून याला पायबंद घालण्यात यावा अशी तक्रार ऑस्ट्रेलियानंतर ब्राझीलनेही भारताविरोधात जागतिक व्यापारी संघटनेकडे केली आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या सरकारने याबाबत प्रथम गेल्या नोव्हेंबरमध्ये भारताविरोधात तक्रार केली होती. भारताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदाने दिल्याने साखरेचे भाव पडले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन व गुंतवणूक मंत्री सिमॉन बर्मिगहॅम यांनी गुरुवारी सांगितले की, भारताची अनुदान देण्याची पद्धत जागतिक व्यापार संघटनेच्या तत्त्वांविरोधात असून त्यामुळे साखर बाजारपेठेला फटका बसला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमधील ऊस उत्पादक व साखर कारखानदार यांच्या हितास बाधा आली असून यात जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार करण्यावाचून गत्यंतर नव्हते.
- ऑस्ट्रेलियाचे भारताशी चांगले संबंध असून व्यापार विषयावर आम्ही त्या देशाविरोधात दाद मागितली यात गैर काही नाही. आमची साखर बाजारपेठ ही निर्यातीवर अवलंबून आहे ८५ टक्के कच्ची साखर निर्यात आमच्या देशातून होते असे कृषी मंत्री डेव्हीड लिटलप्राउड यांनी म्हटले आहे.
बॅडमिंटन प्रशिक्षक टॅन किम हर यांचा राजीनामा
- २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकपर्यंत टॅन यांचा प्रशिक्षकपदाचा कालावधी होता. मात्र, त्यापूर्वीच दीड वर्ष अगोदर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. ‘‘टॅन यांना काही कौटुंबिक समस्या असल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे,’’ असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव ओमर रशिद यांनी सांगितले.
- टॅन हे जपानच्या निप्पॉन बॅडमिंटन संघटनेकडे जाणार असल्याच्या चर्चेबाबत कोणतेही भाष्य करण्यास रशिद यांनी नकार दिला. टॅन यांनी यापूर्वी मलेशिया, इंग्लंड, दक्षिण कोरिया या देशांच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली होती. टॅनच्या मार्गदर्शनाखालीच भारताचे चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रॅँकिरेड्डी ही जोडी विशेषत्वे उदयाला आली. या जोडीने भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवून दिले होते. महिलांमध्ये अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीनेदेखील दमदार कामगिरी नोंदवली असून त्यांनी राष्ट्रकुलमध्ये कांस्यपदक मिळवले होते.
इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा प्रथमच इंदिरा गांधी स्टेडियमवर
- इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा यंदा २६ ते ३१ मार्चदरम्यान रंगणार असून ही स्पर्धा प्रथमच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. गेल्या सात वर्षांपासून ही स्पर्धा सिरी फोर्ट क्रीडा संकुलात भरवली जात होती. मात्र यंदा प्रथमच ही स्पर्धा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय संकुलात भरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- १९८२ साली आशियाई क्रीडा स्पर्धाचे आयोजन झाल्यानंतर गतवर्षी झालेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा या क्रीडा संकुलात पार पडल्या होत्या. संपूर्ण स्पर्धा खाशाबा जाधव सभागृहात झाल्या होत्या. त्या स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी दमदार कामगिरीची नोंद केली होती. त्याप्रमाणेच पुन्हा त्याच स्टेडियमवर स्पर्धा भरवून भारतीय बॅडमिंटनपटू दमदार कामगिरी करतील, असा विश्वास भारताच्या बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमांता विश्व शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
- इंडिया खुली राष्ट्रीय स्पर्धा ही २०११ पासून बीडब्ल्यूएफ सुपर सीरिज स्पर्धेचा भाग आहे. टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये थेट प्रवेशासाठी ही स्पर्धा जिंकून पात्र होण्यासाठी अधिकाधिक अव्वल बॅडमिंटनपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
‘जीएसटी’ संकलन पुन्हा रोडावले ; फेब्रुवारीत ९७,२४७ कोटी रुपये जमा
- वस्तू व सेवा कर संकलनाने पुन्हा एकदा एक लाख कोटी रुपयांपासून फारकत घेतली आहे. फेब्रुवारीमधील अप्रत्यक्ष कर संकलन ९७,२४७ कोटी रुपये झाले आहे.
- जानेवारी २०१९ मध्ये वस्तू व सेवा करापोटी १.०२ लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला होता. चालू वित्त वर्षांत तिसऱ्यांदा या टप्प्यापर्यंतची रक्कम जमा झाली आहे.
- मात्र फेब्रुवारीमध्ये त्यात काही प्रमाणात घसरण होऊन ही रक्कम एक लाख कोटी रुपयांच्या आत स्थिरावली. पैकी १७,६२६ कोटी रुपये मध्यवर्ती वस्तू व सेवा करापोटी तर २४,१९२ कोटी रुपये राज्य वस्तू व सेवा कराद्वारे जमा झाले आहेत. तर अधिभार म्हणून ८४७६ कोटी रुपये कर संकलन झाले आहे.
- वार्षिक तुलनेत यंदा वस्तू व सेवा कर संकलन १३.१२ टक्क्यांनी वाढले आहे. वर्षभरापूर्वी, फेब्रुवारी २०१८ मध्ये ८५,९६२ कोटी रुपयांचा अप्रत्यक्ष कर सरकारला मिळाला होता.
इन्फोसिस फाउंडेशनच्या पुरस्कारांवर पुण्याच्या अजिंक्य धारिया, स्वप्नील चतुर्वेदीची मोहोर
- इन्फोसिस फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड २०१८-१९’ वर यंदा पुण्याच्या अजिंक्य धारिया आणि स्वप्नील चतुर्वेदी या तरूणांनी आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. स्वप्नील चतुर्वेदी याला ‘स्मार्टलू’ बांधणी प्रकल्पासाठी गौरविण्यात आले, तर अजिंक्य धारिया याला ‘पॅडकेअर’ हे सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणारे सयंत्र विकसित केल्याबद्दल इन्फोसिस फाउंडेशनकडून गौरवण्यात आले आहे.
- वंचित गटातील व्यक्तींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, गट आणि स्वयंसेवी संस्थांना इन्फोसिस फाउंडेशनतर्फे आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्डने गौरवण्यात येते. यावर्षी सामाजिक क्षेत्रातील कामासाठी बारा जणांना एक कोटी सत्तर लाख रूपयांचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. आरोग्य, ग्रामीण विकास, निराधारांना मदत, महिला सुरक्षितता आणि सबलीकरण, शिक्षण आणि क्रीडा या विभागांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात.