महाराष्ट्रासोबत पाणी वाटप करार करण्यासाठी कर्नाटक तयार
- कृष्णा नदीकाठी असलेल्या कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट आणि आणि विजापुर जिल्ह्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्यात पाणी वाटपासंदर्भात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारला परस्पर पाणी वाटपासंदर्भात एक प्रस्ताव दिला होता.
- महाराष्ट्र सरकार कोयना धरणातून चिकोडी, बागलकोट आणि विजयपुराला पाणी सोडणार असून त्याबदल्यात कर्नाटकाने महाराष्ट्रातील सोलापूर आणि जतसाठी पाणी द्यावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आला होता.
- कर्नाटक सरकारनेही महाराष्ट्राच्या या प्रस्तावावर सकारात्मक असल्याचं सांगत लवकरच याबाबत सामंजस्य करार करणार असल्याची माहिती दिली.
- जर कर्नाटक सराकराने दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात 2 टीएमसी पाणी सोडल्यास महाराष्ट्र सरकारही दरवर्षी उन्हाळ्यात 4 टीएमसी पिण्याचे पाणी सोडेल, असा प्रस्ताव महाराष्ट्राकडून देण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्र सराकार 2004 ते 2017 या कालावधीत कर्नाटकाला पाणी सोडत होते आणि त्याबदल्यात मोबदलाही घेण्यात येत होता.
भारतीय किनारपट्टी भागात फ्रान्स गुंतवणूक करणार
- भारतातील किनारपट्ट्यांवर पर्यटन आणि इतर उद्योग विकसित करण्यास मोठा वाव आहे. यासाठी फ्रान्समधील उद्योग गुंतवणूक करू इच्छित आहेत. याबाबतच्या शक्यता आजमावण्यासाठी गोवा येथे फ्रान्स सरकारने एका गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले आहे.
- फ्रान्सच्या वतीने असा प्रस्ताव गोव्याच्या राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर अशाप्रकारची परिषद आगामी काळातही घेण्याची इच्छा फ्रान्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचित केली आहे भारताला मोठी किनारपट्टी लाभली आहे. याठिकाणी पर्यटनाबरोबरच आयात निर्यातीवर आधारित इतर उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकतात.
“वेला’ या पाणबुडीचे जलावतरण
- स्कॉर्पिन वर्गातल्या “वेला’ या चौथ्या पाणबुडीचे आज मुंबईत जलावतरण झाले. संरक्षण (उत्पादन) सचिव डॉ. अजय कुमार यांच्या पत्नी वीणा अजय कुमार यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. माझगांव डॉक शिपबिल्डर्सने भारतीय नौदलासाठी ही पाणबुडी बांधली आहे.
- भारतीय नौदलात ही पाणबुडी समाविष्ट करण्यापूर्वी बंदरात आणि समुद्रातही या पाणबुडीच्या कठोर चाचण्या घेण्यात येतील. स्कॉर्पिन श्रेणीतल्या सहा पाणबुड्या बांधण्यासाठी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी फ्रान्समधल्या नेव्हल ग्रुपशी करार झाला आहे. माझगांव गोदीत सध्या आठ युद्ध नौका आणि पाच पाणबुड्या बांधण्याचे काम सुरु आहे.
विश्वविक्रमी ३६५ धावांची सलामी
- वेस्ट इंडिजचे सलामीवीर जॉन कॅम्पबेल आणि शाय होप यांनी केलेल्या ३६५ धावांच्या तडाखेबंद सलामीच्या भागीदारीमुळे वेस्ट इंडिजने तिरंगी मालिकेतील एकदिवसीय सामन्यात आयर्लंडला तब्बल १९६ धावांनी धूळ चारली.
- कॅम्पबेल आणि होप यांनी सलामीला फलंदाजीला उतरत अनुक्रमे १७९ आणि १७० धावांची तुफानी खेळी केली.
- कॅम्पबेलने १३७ चेंडूंचा सामना करताना १५ चौकार आणि ६ षटकार लगावले, तर होपने १५२ चेंडूंचा सामना करीत २२ चौकार आणि दोन षटकार लगावत विश्वविक्रमी सलामी दिली.
- या सलामीवीरांनी पाकिस्तानच्या इमाम उल हक आणि फखर झमान या जोडीचा झिम्बाब्वेतील ३०४ धावांच्या सलामीचा गतवर्षांतील विक्रम मोडीत काढला. तसेच ते एकदिवसीय क्रिकेटमधील कोणत्याही क्रमांकावरील सर्वात मोठय़ा भागीदारीच्या विश्वविक्रमाजवळ पोहोचले होते. मात्र, ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल्स यांनी दुसऱ्या गडय़ासाठी २०१५ सालच्या विश्वचषकात केलेल्या ३७२ धावांच्या भागीदारीच्या विक्रमापासून अवघे ७ धावा दूर राहिले.
डॉ. ऋतुजा तारक यांना प्रतिष्ठेचा जॉन हॉर्पर पुरस्कार
- अमेरिकेत संशोधक म्हणून कार्यरत डॉ. ऋतुजा चित्रा तारक यांना इकॉलॉजीतील यावर्षीचा आंतरराष्ट्रीय जॉन हॉर्पर पुरस्कार प्राप्त झाला असून हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत.
- २००८ पासून ब्रिटिश इकॉलॉजिकल सोसायटीतर्फे दरवर्षी हा पुरस्कार मूलभूत संशोधन करणाऱ्या युवा शास्त्रज्ञास दिला जातो. त्यासाठी आंतरराष्ट्रीय संशोधन (रिसर्च जर्नल्स) पत्रिकांतील सर्वोत्तम संशोधनाची निवड संपादक मंडळ करते.
- जागतिक हवामान बदलाचा जीवसृष्टीवर होणाऱ्या परिणामांवर जगभर संशोधन सुरू आहे. डॉ. ऋतुजा यांनी सात वर्षे उष्णकटिबंधीय शुष्क जंगलातील वनसृष्टीवर दुष्काळीस्थितीत काय परिणाम होईल, याचा सखोल अभ्यास केला. कमी पर्जन्यात जंगलातील वनस्पती अल्प पाण्यावर कसा सामना करतात, हा त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय होता. दूरवर पसरलेली मुळे व पाण्याचे स्रोत यातील परस्पर संबंधाचा तौलनिक अभ्यास हा आधार होता.