# महाराष्ट्र महापालिका अधिनियमात सुधारणा
महापालिकेच्या जमिनीवर वसलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमधील पात्र झोपडीधारकांना त्यांच्या धारणक्षेत्रानुसार आता वैयक्तिक स्वरूपात जमिनीचे पट्टेवाटप करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 79 (ग) नुसार यापूर्वी केवळ झोपडीधारक सदस्य असणाऱ्या सहकारी संस्थांनाच जमिनी देता येत होत्या. मात्र, यामुळे त्यांचे पुनर्वसन करताना अनेक अडचणी येऊन प्रकल्प वेळेत पूर्ण होत नव्हते. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार होणाऱ्या सुधारणेनंतर महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पनर्विकास) अधिनियम 1971 मधील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या झोपडीधारकांना याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील कलम 79 (ग) मध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या दुसऱ्या परंतुकानुसार पात्र झोपडीधारकांना पट्टेवाटप करताना लागू करावयाच्या अटी व शर्ती त्याचप्रमाणे आकारावयाच्या अधिमूल्याची रक्कम शासन निश्चित करणार आहे. त्यानुसारच पात्र झोपडीधारकांना जमिनीचे पट्टे दिले जाणार आहेत.
# यूपीएससी परीक्षेमध्ये कर्नाटकच्या नंदिनी के.आर. देशात प्रथम
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) जाहीर झालेल्या निकालामध्ये कर्नाटकच्या नंदिनी के.आर. हिने देशात अव्वल स्थान पटकावले. अनमोल शेर सिंग बेदी अणि जी. रोनान्की यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले. आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा), आयएफएस (भारतीय विदेश सेवा), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि केंद्रीय सेवांच्या नियुक्तीसाठी एकूण 1099 उमेदवारांची निवड करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी ही नागरी सेवा परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि मुलाखती अशा तीन टप्प्यांत घेतली जाते.
# डॉ. खोचीकर ‘सर्जरी’च्या जागतिक संदर्भग्रंथाचे लेखक
वैद्यकीय क्षेत्रात शल्यचिकित्सेचा जागतिक दर्जाचा संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता असलेल्या ‘सर्जरी कोअर प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस’ या दोन खंडातील ग्रंथात येथील प्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांच्या दोन अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश झाला आहे. अमेरिकेतील जेपी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या ग्रंथाचे जॉन कॉर्सन आणि रॉबीन विल्यम्सन संपादक आहेत. भारतातील फक्त दोन डॉक्टर या ग्रंथासाठी निमंत्रित लेखक होते. ‘मूत्रपिंडाचे कर्करोग आणि अंडाशयाचे आजार’ या दोन विषयांवर त्यांचे प्रबंध आहेत.