Current Affairs : 12 January 2021
मधू मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार जाहीर
कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतील आणि मराठी साहित्यविश्वातील अत्यंत मानाचा समजला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांना जाहीर करण्यात आला आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या मुक्तायन सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी कर्णिक यांचे नाव जाहीर केले.
ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकांसाठी वर्षाआड ‘जनस्थान’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येताे.
एक लाख व ब्राँझची सूर्यमूर्ती व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दरवर्षी हा पुरस्कार कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी अर्थात २७ फेब्रुवारी राेजी प्रदान करण्यात येताे.
भारतीय महिला वैमानिकांचा विक्रम
सर्व महिला वैमानिकांनी सारथ्य केलेले एअर इंडियाचे सॅन फ्रान्सिस्को- बंगळूरु हे विमान बंगळूरुला येऊन पोहचले आणि भारतीय विमानाने विना थांबा सर्वाधिक अंतर पार करण्याच्या या विक्रमाची देशाच्या हवाई वाहतुकीच्या इतिहासात नोंद झाली.
सर्व महिला वैमानिकांचा समावेश असलेल्या या चमूने उत्तर ध्रुवावरून सर्वाधिक अंतराचे उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे.
जगाच्या दोन विरुद्ध टोकांवर असलेल्या या दोन शहरांतील थेट अंतर १३,९९३ किलोमीटर असून, त्यात सुमारे १३.५ तासांचा ‘टाइम झोन’ बदल होतो.
नेमबाज तेजस्विनीने पटकावले ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराचे जेतेपद
भारताची अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंत हिने पंजाबच्या अंजूम मुदगिल हिने वर्चस्व मोडीत काढत नेमबाजी सराव स्पर्धेत महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराचे जेतेपद मिळवले.
नव्या वर्षाच्या प्रारंभीच निर्यातीत 16 टक्के वाढ
कोरोनाच्या संकटामधून भारतीय अर्थव्यवस्था आता सुधारू लागली असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्याच सप्ताहामध्ये देशाच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे.
औषधे आणि इंजिनीअरिंग या क्षेत्रांमधील निर्यात वाढल्यामुळे ही वाढ नोंदविली गेली आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती देतांना सांगितले की, मागील वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहामध्ये ५.३४ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती.
या वर्षी मात्र त्यामध्ये वाढ होऊन ती ६.२१ अब्ज डॉलरवर गेली आहे. याचाच अर्थ, वार्षिक वाढीचा विचार करता, निर्यातीमध्ये १६.२२ टक्के एवढी वाढ झाली आहे.
याच कालावधीमध्ये देशात झालेल्या आयातीतही वाढ झाल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.
आयातीमध्ये १.०७ टक्के वाढ होऊन ती ८.७ अब्ज डाॅलरवर पोहोचली आहे. मागील वर्षी ती ८.६ अब्ज डाॅलर होती. निर्यातीमध्ये झालेली वाढ ही रत्ने आणि दागिने, इंजिनीअरिंग उद्योग आणि रसायने उद्योगाने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे झाली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये नऊ महिन्यांच्या खंडानंतर देशाच्या निर्यातीमध्ये वाढ झालेली दिसून आली.
या सप्ताहात औषधांची निर्यात ६.१६२ कोटी डॉलरची झाली. मागील वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये १४.४ टक्के वाढ झाली. पेट्रोलियम पदार्थांची निर्यात १७.२८ टक्के वाढून ११.४७२ कोटी डॉलर झाली आहे. इंजिनीअरिंग उद्योगाची निर्यात ५१.८२ टक्क्यांनी वाढून ६३.६७७ कोटी डॉलरवर गेली आहे.