1) आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा शी जिनपिंग यांचा मार्ग मोकळा
चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची निर्धारित मर्यादा संपुष्टात आणली आहे. त्यामुळे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चीनच्या संसदेने दोन कार्यकाळाची अनिवार्यता दोन तृतीयांश बहुमताने संपुष्टात आणली. सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) द्वारे प्रस्तावित सुधारणेस मंजुरी मिळणार हे निश्चितच मानले जात होते. तत्पूर्वी, माओत्से तुंग यांच्याप्रमाणे अनिश्चित काळापर्यंत एखाद्याकडून सत्ता मिळवण्याचा धोका ओळखून ज्येष्ठ नेते देंग शियोपिंग यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी दोन कार्यकाळ म्हणजेच १० वर्षांपर्यंत सत्तेत राहण्याची मर्यादा निश्चित केली होती. दरम्यान, रविवारी झालेल्या संवैधानिक बदलाबरोबरच ६४ वर्षी शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे, जो २०२३ मध्ये संपणार आहे.
2) नवजोत कौर दुसऱ्या क्रमांकावर
आशियाई विजेतेपद पटकाविणारी कुस्तीगीर नवजोत कौर हिला ६५ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले आहे. जागतिक कुस्ती महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत नवजोतने ही झेप घेतली आहे. किरगिझस्तान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्ण जिंकले होते आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. या क्रमवारीत प्रथमच एवढे वरचे स्थान नवजोतला मिळाले आहे. पहिल्या क्रमांकावर फिनलंडची पेत्रा ओली आहे. विनेश फोगट ही ५० किलो वजनी गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ५९ किलो गटात संगीता फोगट पाचव्या क्रमांकावर आहे. ६२ किलोत ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक चौथ्या स्थानावर आहे.
3) रेशन दुकानात मिळणार दूध
मुंबई आणि ठाणेपाठोपाठ राज्यातही शिधावाटप क्षेत्रातील अधिकृत रास्त भाव दुकानातून महानंद दुग्धशाळेचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकत मिळणार आहेत. याबाबतचा सरकारने निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील २९०० रेशनदुकानांमधून सर्वसामान्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा लाभ मिळू शकणार आहे.
4) अब्जाधीशांच्या यादीत भारत प्रथमच जगात तिसरा
अब्जाधीशांच्या यादीत भारत पहिल्यांदाच जगात तिसऱ्या स्थानावर झळकला आहे. भारतात एकूण १२१ अब्जाधीश असून ही संख्या मागील वर्षीपेक्षा १९ अंकांनी वधारली आहे. अमेरिकेत सर्वाधिक ५८५ तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत. फोर्ब्जने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज १०० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह प्रथम क्रमांकावर आहेत. भारतात मुकेश अंबानींची संपत्ती सर्वाधिक ४०.१ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या संपत्तीत मागील वर्षीपेक्षा १६.९ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. त्यांचे भारतातल्या सर्वाधिक श्रीमंताच्या यादीतले स्थान यंदाही अढळ आहे. जागतिक पातळीवर त्यांनी ३३ व्या क्रमांकावरून १९ व्या क्रमांकावर भरारी घेतली आहे. २०१७ मध्ये २३.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते ३३ व्या स्थानावर होते. अझीम प्रेमजी यांनी लक्ष्मी मित्तल यांना यंदा मागे टाकत भारतातले सर्वाधिक श्रीमंतांचे दुसरे स्थान पटकावले आहे. जिंदाल स्टील अँड पावरच्या सावित्री जिंदाल या सर्वाधिक श्रीमंत भारतीय महिला ठरल्या आहेत. जागतिक क्रमवारीत त्या ८.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १७६ व्या स्थानावर आहेत. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा १.७ अब्ज डॉलर्ससह जागतिक यादीतले सर्वात कमी वयाचे भारतीय अब्जाधीश ठरले आहेत. एचसीएलचे संस्थापक शीव नाडर चौथे तर सन फार्माचे दिलीप संघवी पाचवे श्रीमंत भारतीय ठरले आहेत.
5) किसान लाँग मार्च – मोर्चेकरांशी बोलणी करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती
नाशिक ते मुंबई असे 180 किमीचे अंतर गेली सहा दिवस कापत मुंबईत पोहचलेल्या किसान लाँग मार्च सोमवारी पाहटे आझाद मैदानावर पोहचला. यात 30 हजारांहून अधिक आंदोलक सहभागी झाले आहेत. आंदोलक मोर्चेकरांशी बोलणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहा मंत्र्यांची समिती गठित केली आहे. या समितीत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख आदी वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक वर्षा निवासस्थानी घेतली.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.