Current Affairs 12 March 2020
अमेरिका-तालिबान शांतता करारास सुरक्षा मंडळात मंजुरी
अमेरिका व तालिबान यांच्यात २९ फेब्रुवारी रोजी झालेल्या शांतता करारास संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने एकमताने मंजुरी दिली आहे. या कराराचे स्वागत करून मंजुरी देणारा ठराव करण्यात आला असून युद्धग्रस्त अफगाणिस्तानात शाश्वत शांतता नांदावी व अमेरिकी सैन्यास तेथून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती तयार व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने मंगळवारी या शांतता करारास मान्यता देणारा ठराव मंजूर केला, तो अमेरिकेने मांडला होता.
तालिबानने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध तोडावेत व अफगाणिस्तानात अमेरिकेच्या सैन्या विरोधात हल्ले करू नयेत असे करारात ठरले आहे. या करारानुसार तालिबानने अफगाण सरकारशी वाटाघाटी करणे अपेक्षित असून त्या लवकरच सुरू होणार आहेत.
करारानंतर लगेचच तालिबानने हिंसाचार केल्याने या वाटाघाटी लांबणीवर पडल्या होत्या. ‘दी ग्रुप ऑफ फ्रेंड्स ऑफ विमेन इन अफगाणिस्तान’ या गटाची संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात बैठक झाली. त्यानंतर काही तासातच कराराचे स्वागत करून मंजुरी देणाऱ्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात मतदान झाले.
लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ केंद्राला आयुष मंत्रालयाचा पुरस्कार
पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील ‘कैवल्यधाम एसएडीटी गुप्ता योगिक रूग्णालय व आरोग्य सेवा केंद्रा’ ला आयुष मंत्रालयाचा माहिती तंत्रज्ञानाच पुरस्कार जाहीर झाला आहे.
विविध श्रेणींमध्ये एकूण पाच व्यक्ती तसेच संस्थांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ या केंद्राचा समावेश आहे.
आयुष मंत्रालयांतर्गत आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथी, युनानी आणि होमिओपॅथी या आरोग्य उपचार पद्धतींचा समावेश होतो.
कैवल्यधाम हे केंद्र पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे असून 170 एकरमध्ये हे केंद्र पसरलेले आहे. या केंद्राची स्थापना 1924 मध्ये स्वामी कैवल्यानंद यांनी केली. येथे आठव्या शतकातील पतंजली अष्टांग योगचे प्रशिक्षण दिले जाते. यासह येथे आयुर्वेद, नॅचरोपॅथी उपचार पद्धती आहेत.
मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वश्रीमंत
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. शेअर बाजार कोसळल्यामुळे त्यांची संपत्ती ४२,६९४ कोटींनी कमी झाली होती. बुधवारी ती ३.१९ लाख कोटी झाली.
मोबाइल गेम्स : १०० देशांत भारत ६४ वा
मोबाइल गेम्स बाजारपेठेत भारत घसरला. आता भारत पहिल्या १०० देशांत ६४ व्या स्थानी आला आहे. एका अहवालानुसार, ५८.४ गुणांसह भारत पाक, फिलिपाइन्ससारख्या देशांपेक्षा पुढे आहे.
रत्नागिरीतील मंडणगडमध्ये १५ वा ‘कासव महोत्सव’ सुरू
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये १५ व्या कासव महोत्सवाला सुरुवात झाली आहे.
मंडणगड तालुक्यातील वेळास येथे कासव महोत्सव आयोजित केला जातो. २८ मार्चपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. कासव मित्र मंडळ आणि वेळास ग्रामपंचायतीकडून घरटी संरक्षित केली जातात आणि त्यानंतर हा महोत्सव आयोजित केला जातो.
महोत्सवादरम्यान, कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. याला पर्यटकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र वनविभाग कासव संरक्षण मोहीम ग्रामस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करतात. कासव महोत्सवाचा अनुभव घेणासाठी महाराष्ट्रातील त्याचबरोबर देशभरातून देखील पर्यटक याठिकाणी भेट देत असतात.
डॉ. नारायण भोसले, नवले, तांदळेंना ‘समष्टी ’पुरस्कार
आंबेडकरी चळवळीतील सर्व तरुण कवी, कलावंत, बुद्धिवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘सारं काही समष्टीसाठी’ या समष्टी फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले असून एकूणच मानवी उत्थानाच्या व परिवर्तनाच्या चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून यावर्षी समष्टी फाउंडेशन तर्फे एकूण तीन पुरस्कार दिले जाणार असून ‘नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार २०२० ‘ डॉ. नारायण भोसले यांना, ‘समष्टी उलगुलान पुरस्कार २०२०’ डॉ. अजित नवले यांना, तर ‘समष्टी गोलपीठा युवा पुरस्कार २०२०’ शरद तांदळे यांना जाहीर झाला आहे.
प्रथम दोन पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम पंचवीस हजार व मानपत्र असे असून गोलपीठा युवा पुरस्काराची रक्कम पाच हजार रुपये व मानपत्र अशी असेल. या पुरस्काराचे वितरण ‘सारं काही समष्टीसाठी’ या कार्यक्रमात होईल. सदर कार्यक्रम १४ आणि १५ मार्च रोजी विद्यानगरी, मराठी भाषा भवन, मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमादरम्यान एकूण चार नाटके, १४ लघुपट, ३ चर्चासत्रे, कविता वाचन असा परिपूर्ण कार्यक्रम होणार आहे.