Uncategorized
Current Affairs 13 February 2019
राज्यात दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला गैरलागू
- केंद्राच्या कायद्यानुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी राज्यात १ फेब्रुवारीपासून राज्य शासकीय सेवा व शिक्षणात १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र, राज्यात मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण लागू असल्याने राज्यातील या दहा टक्के आरक्षणाचा लाभ त्यांना मिळणार नाही.
- केंद्रीय सेवा व शिक्षण संस्थांमध्ये राज्यघटनेच्या अनुच्छेद १५ (४) व (५) आणि अनुच्छेद १६ (४) नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसींना ४९.५ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षण लागू करण्यासाठी घटनादुरुस्तीद्वारे कायदा करण्यात आला.
- राज्यात आरक्षणासंबंधी २००४ चा अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व ओबीसी आणि २०१८ चा महाराष्ट्र राज्य सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गासाठी आरक्षण कायदा असे दोन कायदे आहेत.
- राखीव प्रवर्गात समावेश नसलेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळून उर्वरित शासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये तसेच शासकीय, निमशासकीय आस्थापना, मंडळे, महामंडळे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरणे यांमध्ये १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे.
- राज्यात सध्या लागू असलेले ६८ टक्के आरक्षण वगळून हे १० टक्के आरक्षण असणार आहे, म्हणजे एकूण आरक्षण ७८ टक्के झाले आहे.
हिरवाई निर्मितीच्या प्रयत्नात भारत-चीनचा मोठा योगदान
- जास्त लोकसंख्येचे देश हे नेहमी पर्यावरणाची हानी करीत असतात, त्यामुळे जमिनीवरील हिरवाईचे क्षेत्र कमी होते, असा आतापर्यंतचा समज असला तरी अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेच्या एका अहवालाने तो खोटा ठरला आहे. चीन व भारत या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांनीच हिरवाई निर्माण करण्याच्या जागतिक उद्दिष्टात मोठे काम केले आहे असे अहवालात म्हटले आहे.
- जगातील एकतृतीयांश हिरवाई भारत व चीनमध्ये असून, जगातील हिरवाईखालील क्षेत्राचा ९ टक्के भाग या दोन्ही देशांत आहे. ११ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या शोधनिबंधात २०००-२०१७ या काळात नासाच्या उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे भारत व चीन या देशांत जगातील इतर पीक क्षेत्रापेक्षा हिरवाईचे पट्टे अधिक आहेत असे म्हटले आहे.
- चीनमधील वनांचे क्षेत्र ४२ टक्के, पीकक्षेत्र ३२ टक्के असून भारतात पीक क्षेत्र ८२ टक्के, तर वन क्षेत्र ४.४ टक्के आहे.भारत व चीनमध्ये १९७०-१९८० या काळात हिरवाईची परिस्थिती चिंताजनक होती.
- जगात हिरवाईचे क्षेत्र वाढत असले तरी ब्राझील व इंडोनेशियात नैसर्गिक हिरवाई कमी होत चालली आहे. त्याचे परिणाम जैवविविधता तसेच परिसंस्थेवर होत आहेत.
राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सिद्धी शिर्केला सुवर्णपदक
- पुण्याच्या सिद्धी शिर्के हिने 64व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने 14 वर्षांखालील मुलींच्या 500 मीटर टाइम ट्रायलमध्ये अव्वल स्थान पटकावले. सिद्धीचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. तिने रोड सायकलिंगमध्ये 6 किलोमीटर टाइम ट्रायलमध्ये सुवर्णयश मिळवले होते.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने म्हाळुंगे-बालेवाडी येथील वेलोड्रम स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सिद्धी शिर्केने 45.110 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले.
- तामिळनाडूच्या एम. पूजा स्वेताने 47.610 सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक प्राप्त केले. तर महाराष्ट्रच्या सुहानी मोरेने 52.517सेकंदासह कांस्यपदकाची कमाई केली.
- 14 वर्षांखालील मुलांच्या 500 मीटर टाइम ट्रायलमध्ये झारखंडच्या नारायण महतोने (40.158 सेकंद) सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्राच्या अथर्व पाटीलला (41.680 सेकंद) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. झारखंडच्या अर्णव श्री याने (41.830 सेकंद) कांस्यपदक मिळवले.