भारताच्या मानवरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी यशस्वी
- स्वदेशी बनावटीच्या मानवरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी येथे यशस्वीरित्या घेण्यात आली असल्याचे बुधवारी संरक्षण सूत्रांनी सांगितले. या विमानाचा वेग अत्यधिस्वनी म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे.
- अत्यधिस्वनी क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्मितीचा महत्त्वाचा भाग म्हणून यातील तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने बंगालच्या उपसागरावरील डॉ. अब्दुल कलाम बेटांवरून सकाळी ११.२५ वाजता ही चाचणी केल्याचे सांगण्यात आले.
- हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमनस्ट्रेटर व्हेइकल (एचएसटीडीव्ही) या विशेष प्रकल्पांतर्गत हे विमान विकसित करण्यात आले असून ते ध्वनीपेक्षा जास्त वेगाने जाते.
- हे विमान वीस सेकंदात ३२.५ कि.मी म्हणजे वीस मैल उंची गाठते. त्याचा वेग ६ मॅकपर्यंत असतो. १५ ते २० कि.मी उंचीवर विमानाची कामगिरी कशी होते याची आधी चाचणी करण्यात आली. ते काम गेली दोन वर्षे सुरू होते.
पहिल्याच कॅबिनेट बैठकीत तीन तलाक विधेयकास मंजुरी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आज तीन तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली. शिवाय मंत्रीमंडळाने जम्मू – काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यासही मंजुरी दिली आहे.
- अध्यादेशाचं कायद्यात परिवर्तन करण्यासाठी विधेयक आणण्यात येणार आहे. शिवाय कॅबिनेटने ‘जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०१९’ ला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणा-या नागरिकांना मदत होईल.
- केंद्र सरकारने आधार आणि अन्य कायदे (संशोधन) विधेयक २०१९ ला ही मंजुरी दिली आहे.
१५ जुलैला चांद्रयान-२ झेपावणार
- चंद्रावर दुसऱ्यांदा पाऊल ठेवण्यासाठी भारत आता सज्ज झाला आहे. कारण, भारताची महत्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-२ सुरु होण्याबाबतची प्रतीक्षा आता संपली आहे. पुढील महिन्यांत १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी हे यान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे.
- चांद्रयान-२ हे १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी प्रक्षेपित केले जाईल. याचे लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. रोव्हर हे एक रोबोटिक यंत्र असून त्याचे वजन २७ किलो असून लांबी १ मीटर आहे. लँडरचे वजन १.४ टन आणि लांबी ३.५ मीटर आहे. तर ऑर्बिटरचे वजन २.४ टन आणि लांबी २.५ मीटर इतकी आहे.
- या कंपोझिट बॉडीला GSLV MK lll लॉन्च व्हेईकलमध्ये गरम आवरणामध्ये ठेवण्यात येईल. १५ जुलैला यानाचे प्रत्यक्ष प्रक्षेपण झाल्यानंतर GSLV MK lll मधून कपोझिट बॉडीला बाहेर ढकलले जाईल. त्यानंतर कंपोझिट बॉडीच्या
- खालच्या भागातून इंधनाचे ज्वलन सुरु झाल्यानंतर ही बॉडी चंद्राच्या दिशेने झेपावेल.
- लँडर चंद्रापासून ३० किमी अंतरावरील कक्षेत ४ दिवस फिरत राहिल.
ऑस्ट्रेलियात धावणार ‘मेक इन इंडिया’ मेट्रो
- भारतातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ योजनेची सुरूवात केली होती. ‘मेक इन इंडिया’ योजनेला आता उत्तम प्रतिसाद मिळत असून ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मेट्रो धावणार आहेत. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.
- गेल्या काही वर्षांमध्ये भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यातच ‘मेक इन इंडिया’ या योजनेमुळे भारतातील उत्पादन क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली आहे. देशांतर्गत आणि परदेशी कंपन्यांद्वारे देशातील उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यातच आता या योजनेला मोठे यश मिळाले असून भारतात तयार करण्यात आलेली मेट्रो ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये धावणार आहे.