१) महाराष्ट्राच्या नदाफ एजाजला राष्ट्रीय शौर्य बाल पुरस्कार
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डीच्या नदाफ एजाज अब्दुल रऊफ या विद्यार्थ्याला २०१७ चा राष्ट्रीय शौर्य बाल पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारा तो महाराष्ट्रातील एकमेव आहे. दहावी वर्गातील एजाज गरीब कुटुंबातील आहे. त्याचे आई-वडील व मोठा भाऊ शेतात मजुरी करतात. गरजा भागत नसल्याने वडिलांना होमगार्डचे काम करावे लागते. शौर्याबद्दल नदाफ म्हणाला, मला पुरस्कार मिळावा म्हणून मी हे काम केले नाही, तर कपडे धुताना नदीत पडलेल्या मुलींना वाचवण्याच्या भावनेतून नदीत उडी घेतली.
तिघांना मरणोत्तर पुरस्कार
देशातील १८ बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला. यात ३ बालकांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित केले जाईल. पुरस्कारप्राप्त बालकांत ७ मुली व ११ मुलांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ जानेवारीला त्यांना गौरवण्यात येईल. चार श्रेणीत देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
२) ‘पिफ’मध्ये गजेंद्र अहिरेंचा ‘पिंपळ’ ठरला सर्वोत्कृष्ट
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर कर्तृत्वाची मोहोर उमटवली. अहिरे दिग्दर्शित ‘पिंपळ’ या चित्रपटाला महाराष्ट्र सरकारचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान मिळाला आहे. जागतिक स्पर्धात्मक विभागातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘प्रभात सर्वोत्कृष्ट चित्रपट’ सन्मान ‘फ्री अँड इझी’ या चिनी चित्रपटाला मिळाला. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘प्रभात सन्मान’ अर्जेंटिनाच्या दिग्दर्शिका ल्युक्रिशिया मर्टिल यांना जाहीर झाला आहे.
अन्य पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट पटकथा (मराठी) गजेंद्र अहिरे : पिंपळ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मराठी) मिताली जगताप : चित्रपट- नशीबवान
अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ या चित्रपटाने स्पेशल ज्युरी अवॉर्डवर नाव कोरले. सर्वोत्कृष्ट छायालेखनासाठी गिरीश जांभळीकर यांना तर या चित्रपटातील १४ वर्षांच्या नायकाच्या भूमिकेसाठी रमण देवकरला अभिनयाचा पुरस्कार मिळाला.
३) आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर
भारतीय बॅडमिंटन महासंघाने आगामी आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ६ ते ११ फेब्रुवारीदरम्यान मलेशियात ही स्पर्धा रंगणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल होऊ शकला नव्हता, म्हणून यंदाच्या स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटन महासंघाने तुल्यबळ संघ मैदानात उतरवला आहे.
आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी असा असेल भारतीय संघ
पुरुष एकेरी गट – किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, साई प्रणीत, समीर वर्मा
महिला एकेरी गट – पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, कृष्णप्रिया, ऋत्विका गड्डे
पुरुष दुहेरी गट – सात्विक साईराज/चिराग शेट्टी, मनु अत्री/सुमीत रेड्डी, श्लोक रामचंद्रन/एम.आर. अर्जुन
महिला दुहेरी गट – आश्विनी पोनाप्पा/सिकी रेड्डी, प्राजक्ता सावंत/संयोगिता, रितूपर्णा दास/मिथीला यु.के.
४) भगत सिंग यांना पाकिस्तानचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार देण्याची मागणी
पाकिस्तानमधील एका संघटनेने शहीद-ए-आजम पुरस्कारप्राप्त शहिद भगत सिंग यांना देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘निशान-ए-हैदर’ देण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे ८६ वर्षांपूर्वी भगत सिंग यांना लाहौरमधील ज्या शादमान चौकात फाशी देण्यात आली तेथे त्यांचा पुतळा उभारावा अशीही मागणी करण्यात आली आहे. स्वतंत्रलढ्यातील क्रांतिकारांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी संबंधित संस्था काम करते. भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. भगत सिंग यांनी भारतीय उपमहाद्वीप स्वतंत्र होण्यासाठी प्राणांची आहुती दिल्याचे भगत सिंग मेमोरियल फाउंडेशनने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारला दिलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिन्ना यांनीही भगत सिंग यांच्याबद्दल बोलताना उपमहाद्वीपात भगत सिंगांसारखा दुसरा कोणताही शूर व्यक्ती झाला नसल्याचे गौरवोद्गार केला होता. भगत सिंग आमचे आदर्श असून त्यांचाही मेजर अजीज भट्टींसारखा सर्वोच्च शोर्य पुरस्कार निशान-ए-हैदर पुरस्कार देऊन सन्मान करायला हवा. अजीज भट्टी यांनी स्वत: भगत सिंग हे आपले आदर्श असल्याचेही या संघटनेने सरकारकडे केलेल्या अर्जात नमूद केले आहे.
५) लष्कराकडून पंधरा मिनिटांत पूल उभारणी
एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर एल्फिन्स्टन आणि आंबिवली येथील पुलाची निर्मिती करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आंबिवली येथील रेल्वेवरील पादचारी पुलाची ऐतिहासिक उभारणी गुरुवारी आंबिवली स्थानकात पार पडली. अवघ्या पंधरा मिनिटात लष्कराचे अभियंते आणि जवानांनी हा पुल उभा केला. आंबिवली येथे १२ फूट रुंद आणि ६० फूट लांबीचा पूल उभारण्यात येणार होता. या पुलाच्या सांगाडय़ाचे वजन १५. ८४ टन इतके होते. बंगालमधून तयार केले गेलेले याचे भाग यापूर्वीच येथे आणण्यात आले होते. तसेच यापूर्वीच येथे दोनही बाजूंना लोखंडी खांब उभारण्यात आले होते. सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या ९ मिनिटांच्या विक्रमी वेळेत लष्कराच्या जवानांनी येथे गर्डर टाकला. त्यानंतर काही मिनिटातच त्याची जोडणीही पूर्ण करण्यात आली. अवघ्या १५ मिनिटात लष्कराचे काम पूर्ण झाले. काम यशस्वीरीत्या पूर्ण होताच लष्कराच्या जवानांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. तसेच ज्या बॉम्बे सॅपर्सचे अभियंते आणि जवानांनी या कामात सहभाग घेतला होता, त्या पथकाचाही या पहिल्यावाहिल्या कामानंतर जयजयकार करण्यात आला. या वेळी एक ब्रिज कमांडर, एक कमिशन अधिकारी, पाच सल्लागार आणि ४० जवानांचा या कामाला हातभार लागला.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.