चालू घडामोडी – १९ जून २०१६
देश-विदेश
मराठवाडय़ात कृत्रिम पावसासाठी मदतीची चीनची तयारी
# चीनने भारताशी दुष्काळग्रस्त भागात क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाने (कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान) पाऊस पाडण्यासाठी मदत करण्याकरिता चर्चा सुरू केली असून स्थानिक हवामान विभागाच्या कर्मचाऱ्यांना या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची तयारीही दर्शवली आहे. बीजिंग, शांघाय, पूर्व चीनमधील अहुई प्रांत यांच्या अधिकाऱ्यांनी अलिकडेच महाराष्ट्राला भेट दिली असून त्यांनी पाऊस पाडण्यासाठीचे तंत्रज्ञान व त्याचे प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्रात गेली दोन वर्षे दुष्काळ आहे. चीन गेली अनेक वर्षे अग्निबाणाच्या मदतीने ढगात सिल्व्हर आयोडाइड शिंपडून अवक्षेप तयार करीत पाऊस पाडण्याचे प्रयोग करीत आहे पण त्यासाठी ढग असणे आवश्यक असते. महाराष्ट्राला चीनने मदत देऊ केली असून ही चर्चा यशस्वी ठरली, तर चिनी तज्ज्ञ भारतीय हवामान विभागाच्या तज्ज्ञांना अत्याधुनिक ढग बीजारोपण तंत्रज्ञान ( क्लाउड सीडिंग टेक्नॉलॉजी) शिकवतील. ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाइड फवारण्याचे हे तंत्रज्ञान यशस्वी करण्याच्या प्रक्रिया त्यात शिकवल्या जातील. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात २०१७ च्या उन्हाळ्यात पाऊस पाडण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. शांघायचे वरिष्ठ अधिकारी हान झेंग व महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात याबाबत चर्चा झाली आहे. हान हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे पॉलिट ब्युरो सदस्य असून त्यांनी चीन महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यात सहकार्य करण्यासाठी मदतीची आमची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. चीनने १९५८ पासून ढग बीजारोपण तंत्रज्ञान सुरू केले असून त्यांच्याकडे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी जगातील सर्वात आधुनिक पद्धती आहेत.
एल निनो परिणामामुळे कार्बनची पातळी वाढणार
# वातावरणातील कार्बन डायॉक्साईड पातळी यावर्षी एल निनो परिणामामुळे वाढणार आहे, ती ४०० पीपीएम (पार्टिकल्स पर मिलियन) इतकी होईल असा अंदाज नवीन संशोधनात वर्तवला आहे. कार्बन डायॉक्साईडची पातळी वाढल्याने हरितगृह परिणाम वाढणार आहे. मेट ऑफिस हॅडली सेंटर फॉर क्लायमेट चेंज व युनिव्हर्सिटी ऑफ एक्सटर यांचे संशोधक रिचर्ड बेटस यांनी सांगितले, की वातावरणात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण मानवी उत्सर्जनांमुळे वाढत आहे. अलीकडच्या एल निनो परिणामामुळे ते अधिकच वाढले आहे. सागरी पृष्ठभागावरच्या तापमानातील फरकांमुळे कटीबंधीय प्रशांत महासागरातील प्रवाहात काही बदल होतात, त्याला एल निनो परिणाम असे म्हणतात. त्यामुळे परिसंस्था तप्त बनतात व कटीबंधीय परिसंस्था कोरडय़ा पडतात. त्यामुळे कार्बनचे शोषण कमी होऊन वणवे पेटतात.
इजिप्तचे माजी अध्यक्ष मोर्सीं यांना ४० वर्षांच्या कैदेची शिक्षा
# देशाची गुपिते कतारला पुरवल्याच्या गुन्ह्य़ासाठी इजिप्तचे पदच्युत इस्लामवादी अध्यक्ष मोहमद मोर्सी यांना स्थानिक न्यायालयाने ४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. याच प्रकरणात ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या सहा सदस्यांना सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा न्यायालयाने कायम केली आणि इतर दोघांना २५ वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोर्सी यांना याच प्रकरणी १५ वर्षांचा अतिरिक्त तुरुंगवास सुनावण्यात आल्यामुळे त्यांच्या कैदेची मुदत ४० वर्षे झाली आहे. हा निकाल अंतिम नसून त्याविरुद्ध अपील केले जाऊ शकते. मोर्सी वगळता इतर प्रतिवादींच्या खटल्याची कागदपत्रे बडय़ा (ग्रँड) मुफ्तीकडे पाठवण्याचा आदेश न्यायालयाने गेल्या महिन्यात दिला होता. इजिप्तच्या कायद्यानुसार मुफ्ती मृत्युदंडाच्या सर्व प्रकरणांचा फेरविचार करू शकतात, मात्र त्यांचा निर्णय बंधनकारक नसतो.