⁠
Uncategorized

Current Affairs 19 March 2018

1) चौथ्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले व्लादिमीर पुतिन

रशियाच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत व्लादिमीर पुतिन पुन्हा निवडून आले आहेत. ते चौथ्यांदा देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले असून त्यांना तब्बल 76 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत.
पुतिन सर्वप्रथम 2000 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. यानंतर 2004 मध्ये पुन्हा निवडून आले आणि 2008 पर्यंत देशाचे राष्ट्राध्यक्ष राहिले. त्यावेळी दोनदाच राष्ट्राध्यक्ष पदावर राहण्याची मर्यादा होती. त्यामुळे, त्यांनी पंतप्रधान पदाची निवडणूक लढवली. 2008 ते 2012 पर्यंत पंतप्रधान राहिल्यानंतर त्यांनी आपल्या बहुमताचा वापर करून राज्यघटनेत बदल केला. तसेच दोनदा राष्ट्राध्यक्ष होण्याची अट संपुष्टात आणतानाच राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ 4 वरून 6 वर्षे केला. 2012 मध्ये ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि पुढची 6 वर्षे रशियातील सर्वात शक्तीशाली नेते म्हणून समोर आले. आता राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत 76 टक्के मते मिळवून त्यांनी रशियाच्या राजकारणात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. सोव्हिएत संघाचे तानाशहा म्हणूनही ओळखल्या जाणारे जोसेफ स्टॅलिन यांनी 1922 ते 1952 असे 30 वर्षांपर्यंत सत्ता गाजवली. त्यांच्यानंतर पुतिन सर्वात जास्त काळ सत्तेवर राहणारे नेते बनले आहेत.

2) बालीचा डे ऑफ सायलेन्स

इंडोनेशियाची राजधानी बाली येथे रविवारी न्येपी सण साजरा झाला. तो दिवस तेथे डे ऑफ सायलेन्स म्हणून साजरा होतो. डे ऑफ सायलेन्स म्हणजे शांततेचा दिवस. या २४ तासांत पूर्ण बालीत सामसूम असते. टीव्ही, इंटरनेट बंद असते. लोक घरांतील दिवेही विझवतात, मौन व्रत ठेवतात आणि घरातच बसून राहतात. रेल्वेस्थानके, विमानतळ ठप्प होतात. रस्त्यांवर सामसूम असते. मौन राहून लोक आपले मन, मेंदू आणि आत्मा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. न्येपी हा बालीच्या हिंदू समुदायाचा प्रमुख सण आहे. ही परंपरा १ हजार वर्षांहून जुनी आहे. प्रत्येक वर्षी हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त तो साजरा केला जातो. या वर्षी न्येपीची वेळ १७ मार्चच्या सकाळी ६ ते १८ मार्चची सकाळ अशी होती. गेल्या वर्षी न्येपीनिमित्त टीव्ही ऑपरेटर्सनी वेगवेगळे कार्यक्रम प्रसारित केले होते. त्याचा विरोध झाल्याने या वर्षी सर्व टीव्ही ऑपरेटर्सनी २४ तास शटडाऊन ठेवले. न्येपीनिमित्त बालीत जेवढी शांतता असते, त्याआधी एक दिवस ‘ओगो-ओगो’ हा तेवढाच उत्साहजनक सण साजरा होतो. यंदाही ओगो-ओगो साजरा करण्यासाठी बालीच्या वेगवेगळ्या बीचवर २५ हजारपेक्षा जास्त लोक जमा झाले. अनेक खेळ आयोजित झाले. फायर स्पोर्ट््सही (आगीचे खेळ) झाले, पण १७ मार्चच्या सकाळी ६ वाजेआधीचे ते थांबले. न्येपीच्या व्यवस्थेची जबाबदारी ‘पेसेलांग’ ही बालीची हिंदू सेना घेते. पेसेलांगच्या सदस्यांनी २४ तास विमानतळ, स्थानके, थिएटर, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि रस्त्यांवर पहारा दिला.

3) भारताचा वृद्धीदर ७.३ टक्के होणार, ‘फिच’चा अहवाल

येत्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर २०१९-२०मध्ये ती ७.५ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज जागतिक मानक संस्था ‘फिच’ने व्यक्त केला आहे. फिचने आपल्या ‘जागतिक आर्थिक दृष्टिक्षेप’ या अहवालात ही माहिती दिली आहे. येत्या आर्थिक वर्षात ती ६.५ टक्क्यांनी वाढेल, असे फिचने म्हटले आहे. केंद्राच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने ६.६ टक्के वृद्धीदर गृहीत धरला आहे. त्यापेक्षा फिचचा अंदाज कमी आहे. सन २०१६-१७मध्ये वृद्धीदर ७.१ टक्के होता. वृद्धीवर परिणाम करणाऱ्या एका धोरणाशी संबंधित घटकाचा परिणाम आता ओसरला आहे. त्यामुळे वृद्धीदरात वाढ होण्याची शक्यता आहे, असे फिचने म्हटले आहे. अमेरिका, युरोझोन आणि चीनमुळे जागतिक वृद्धीही चांगली राहील, असे फिचने नमूद केले आहे. सन २०१९पर्यंत सलग तीन वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ३ टक्के राहील. २०००च्या मध्यानंतर ही कामगिरी करणे जागतिक अर्थव्यवस्थेला शक्य झाले नव्हते, असे फिचने म्हटले आहे.

4) निष्क्रिय बँक खात्यांमध्ये रु११,३०० कोटी पडून

रिझर्व्ह बँकेतर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील ६४ बँकांच्या तीन कोटींहून अधिक खात्यांमध्ये ११,३०२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम विनावापर पडून असल्याचे समोर आले आहे. विनावापर पडून असलेल्या रकमेमध्ये सर्वाधिक रक्कम स्टेट बँकेची (१,२६२ कोटी रुपये) असून, त्या पाठोपाठ पंजाब नॅशनल बँक (१,२५० कोटी रुपये) यांचा अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक लागतो. या शिवाय उर्वरित बँकांमध्ये ७,०४० कोटी रुपये पडून आहेत. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार अॅक्सिस, डीसीबी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, इंडसइंड, कोटक महिंद्र आणि येस बँक या खासगी क्षेत्रातील बँकांकडे मिळून ८२४ कोटी रुपये विनावापर पडून आहेत. खासगी बँकांपैकी सर्वाधिक विनावापर रक्कम आयसीआयसीआय बँकेकडे (४७६ कोटी रुपये) असून, त्यापाठोपाठ १५१ कोटी रुपये कोटक महिंद्र बँकेत पडून आहेत. देशात कार्यरत २५ विदेशी बँकांकडे विनावापर पडून असलेली रक्कम ३३२ कोटी रुपये आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Related Articles

Check Also
Close
Back to top button