चालू घडामोडी : १९ सप्टेंबर २०२०
Current Affairs : 19 September 2020
खासदारांची पगार कपात करणारं विधेयक राज्यसभेत मंजूर
लोकसभेने खासदारांचं वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक (Salaries and Allowances of Ministers Amendment Bill, 2020) मंजूर करण्यात आलं होतं. यामुळे आता पुढील वर्षभरासाठी खासदारांच्या वेतनामध्ये ३० टक्के कपात होणार आहे.
त्याचबरोबर प्रत्येक खासादाराला दरवर्षी देण्यात येणाऱ्या ५ कोटींच्या खासदार निधीही पुढील दोन वर्षांसाठी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं.
करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून राज्यसभेत आवाजी मतदानाद्वारे दोन्ही विधेयकं संमत करण्यात आली. ]
कलम १०६ अंतर्गत सरकारने हे विधेयक आणण्यात आलं.
एक वर्ष वेतन कपात होणाऱ्यांमध्ये पंतप्रधान, मंत्रीमंडळातील मंत्री, राज्यमंत्री आणि खासदारांचा समावेश आहे.
या विधेयकानुसार एप्रिल २०२० ते पुढील आर्थिक वर्षापर्यंत वेतन कपात होणार आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ७९० खासदार असतात.
यापैकी लोकसभेत ५४५ तर राज्यसभेत २४५ खासदार असतात. सध्या लोकसभेमध्ये ५४२ तर राज्यसभेत २३८ सदस्य कार्यरत आहेत.
त्यामुळे एकूण खासदार संख्या ७८० इतकी आहे. त्यामुळेच प्रत्येक खासदाराच्या पगारामधून ३० हजार रुपयांची कपात केल्यास महिन्याला २ कोटी ३४ लाख रुपयांची बचत होणार आहे.
सेंट लुइस बुद्धिबळ स्पर्धा : भारताचा हरिकृष्ण पाचव्या स्थानी कायम
भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णला सेंट लुइस ऑनलाइन जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत जलद प्रकारात संयुक्तपणे पाचव्या स्थानी कायम राहावे लागले आहे.
हरिकृष्णने जलद प्रकारात अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये विजयासह चांगली सुरुवात केली होती. त्याने अमेरिकेच्या जेफ्री झियाँगला ६६ चालींमध्ये नमवले. मात्र अमेरिकेच्या हिकारू नाकामुराविरुद्ध हरिकृष्णला बरोबरी स्वीकारावी लागली होती. मात्र अखेरच्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ले सो याच्याकडून हरिकृष्णला ६९ चालींमध्ये पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे पाचव्या स्थानी समाधान मानण्याची वेळ हरिकृष्णवर आली.
याउलट सो याने जलद प्रकारात नऊ फेऱ्यांअखेर १३ गुणांसह आघाडी घेतली. याउलट रशियाच्या अलेक्झांडर ग्रिशुककडून पराभव झाल्याने नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. स्पर्धेत आता अतिजलद प्रकाराला सुरुवात होणार आहे.
वायव्य चीनमध्ये brucellosis चा नवा विषाणू
वायव्य चीनमध्ये ब्रुसेलोसिसचा (brucellosis) संसर्ग झालेले हजारो रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
एका औषध निर्मिती कंपनीमधून लीक झालेल्या रसायनांमुळे विषाणूमुळे होणाऱ्या या आजाराचे हजारो रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.
गान्सू प्रांतातील लॅन्झू शहरातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ब्रुसेलोसिसचे तीन हजार 235 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रुसेला या विषाणुमुळे हा आजार होतो असं सांगण्यात आलं आहे.
24 जुलै 2019 ते 20 ऑगस्टदरम्यान झॉनगुम लॅन्झू येथील जैविक औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये लस निर्मिती करण्याचं काम केलं जात होतं.
लॅन्झू येथील प्राणी संशोधन केंद्राजवळ असणाऱ्या या कारखान्यामध्ये प्राण्यांना होणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रुसेला विषाणुंच्या मदतीने औषधांची निर्मीत करण्यात येत होती.
याच औषध निर्मितीदरम्यान कारखान्यातील धूर आणि गॅस प्रक्रिया न करता तो बाहेर सोडण्यात आला. त्यामधूनच लोकांना आता आजाराची बाधा झाली आहे.