⁠  ⁠

चालू घडामोडी – २ ऑगस्ट २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 3 Min Read
3 Min Read

महाराष्ट्र

राज्यात न्यायसहायक वैज्ञानिक तपासणीचे पहिले वाहन चंद्रपूर जिल्हा पोलिस सेवेत
# पोलिस दलाचा तपास संथगतीने होतो. त्यामुळे वेगाने तपास होऊन गुन्हेगाराला तात्काळ अटक व्हावी, असे प्रत्येकाला वाटते. राज्यातील जनतेची ही मागणी लक्षात घेता पोलिस दलाच्या तपासाच्या प्रचलित पध्दतीला गती आणण्यासाठी राज्य शासनाने न्यायसहायक वैज्ञानिक तपासणी वाहनाची निर्मिती केली आहे. यातीलच पहिले वाहन चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या सेवेत दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, या वाहनात अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त १३ किटस् असून गुन्हा घडल्यावर गुन्ह्य़ाची वैज्ञानिक तपासणी घटनास्थळीच होणार आहे.

अर्थव्यवस्था

वाहन विक्री वेगात
# दमदार मान्सूनचे स्वागत आणि आगामी सणांची चाहूल देशातील वाहन विक्रीवरून लागली आहे. जुलैअखेरच्या महिन्यात मारुती, ह्य़ुंदाईसह अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनातील विक्रीत लक्षणीय वाढ नोंदविली आहे. मारुती सुझुकीने सर्वोत्तम मासिक प्रवासी वाहन विक्री नोंदविताना जुलैमध्ये १,२५,७७८ हा आकडा गाठला आहे. वार्षिक तुलनेत ही वाढ १३.९० टक्के आहे. कंपनीने वर्षभरापूर्वी १.१० लाख वाहन विक्री राखली होती. यामुळे कंपनीचा समभाग मुंबई शेअर बाजारात त्याचा सर्वोच्च मूल्य नोंदविणाराही ठरला. कंपनीने नव्याने सादर केलेल्या व्हिटारा ब्रेझा, एर्टिगा, एस-क्रॉससारख्या वाहनांची विक्री गेल्या महिन्यात दुपटीने वाढली आहे. कंपनीच्या छोटय़ा तसेच व्हॅन प्रकारातील वाहनांची विक्री मात्र ७.२ टक्क्य़ांनी घसरली आहे. तसेच स्विफ्ट, रिट्झ डिझायर, बलोनोची विक्री वाढली आहे.

भारतीय निर्मिती क्षेत्र जोमात
# उत्पादित वस्तूंना असलेली मागणी पुन्हा एकदा उंचावल्याने देशातील निर्मिती क्षेत्राची वाढ गेल्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. निर्मिती क्षेत्र जुलैमध्ये ५१.८ टक्क्य़ांवर गेले आहे. मात्र देशातील रोजगार तसेच महागाईवरील संकट अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या निक्केई मार्किट इंडिया निर्मिती व्यवस्थापकांच्या निर्देशांकांनुसार (पीएमआय) तो ५१.८ टक्क्य़ांवर गेला आहे. आधीच्या – जूनमध्ये हा दर ५१.७ टक्के होता. ५० टक्के दर हा या निर्देशांकाचा स्तर निर्मिती क्षेत्राचा समाधानकारक प्रवास अधोरेखित करतो. त्याखाली तो नकारात्मक तर त्यापेक्षा अधिक लांब तो प्रगतीकारक मानला जातो. भारताने एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत संथ अर्थव्यवस्थेची नोंद केल्यानंतर जुलैची सुरुवात तुलनेत चांगली झाल्याचे या निर्देशांकाच्या निमित्ताने मार्किटचे अर्थतज्ज्ञ पॉलिआना डे लिमा यांनी म्हटले आहे. निर्मिती क्षेत्राला स्थानिक तसेच जगभरातील अन्य बाजारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे यंदाच्या आकडेवारीवरून दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

मारुती सुझुकीची किंमतवाढ
# देशात वाहन विक्रीत अव्वल असलेल्या मारुती सुझुकीने तिच्या विविध वाहनांच्या किंमती तातडीने वाढविल्या आहेत. यामध्ये नवागत व्हिटारा ब्रेझासह अल्टो ८०० आदी वाहनांचाही समावेश आहे. कंपनीच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझा २० हजार रुपयांनी तर हॅचबॅक ब्रेझा १० हजार रुपयांनी महाग झाल्या आहेत. कंपनीची २ ऑगस्टपासून लागू होणारी किंमतवाढ १,५०० ते २०,००० रुपयांपर्यंतची आहे. चलनातील लक्षणीय बदलापोटी वाहनांचे दर वाढवावे लागल्याचे स्पष्ट करणाऱ्या मारुतीची विविध वाहने २.४५ ते १२.०३ लाख रुपये दरम्यान आहेत.

TAGGED:
Share This Article