---Advertisement---

चालू घडामोडी – २० एप्रिल २०१६

By Tushar Bhambare

Published On:

chalu-ghadamodi-current-affairs-in-marathi
---Advertisement---
देश-विदेश

हायकोर्टाचे केंद्रावर ताशेरे
राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लादण्यासाठी दुर्बिण घेऊन संधी शोधत राहणार का, असा थेट प्रश्न विचारत उत्तराखंडमधील उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारवर तिखट शब्दांत ताशेरे ओढले. काँग्रेसच्या नऊ आमदारांना निलंबित केले जाईल, याबद्दल केंद्र सरकार इतके चिंतीत का होते, असाही प्रश्न न्यायालयाने विचारला.

उर्दू शायर राहत इंदौरींना अमेरिकेने व्हिसा नाकारला
प्रसिद्ध शायर आणि गीतकार राहत इंदौरींना व्हिसा देण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. अमेरिकेतील टेक्सास येथे पुढील महिन्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना तेथे जायचे होते. कार्यक्रम संपल्यानंतर भारतात परतणार असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांना समजाविण्यास आपण असमर्थ ठरल्याचे इंदौरी यांनी म्हटले आहे.

एपी, रॉयटर्स, न्यूयॉर्क टाइम्सला पुलित्झर पुरस्कार
अमेरिकी पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी देण्यात येणाऱ्या पुलित्झर पुरस्कार विजेत्यांमध्ये यंदा ‘द असोसिएटेड प्रेस’ (एपी) व ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्था तसेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राचा समावेश आहे. पुरस्कारांचे हे १००वे वर्ष असून न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्र

टिपेश्वर अभयारण्यात अग्नितांडव
विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या केळापूर तालुक्यातील प्रसिद्ध टिपेश्वर अभयारण्याला मंगळवारी दुपारी आग लागून ६० टक्के जंगल जळून राख झाले. आगीच्या पाश्र्वभूमीवर या जंगलातील १३ वाघांसह अन्य पशुपक्षी स्थलांतर करण्याची भीती निर्माण झाली आहे. अभयारण्याला कुठेही कुंपण नाही. केवळ शिंगणा आणि माथनी या दोन गावांच्या सीमेवर प्रवेशद्वार आहे.

क्रीडा

राहुल जोहरी बीसीसीआयचे नवे सीईओ
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) पदावर राहुल जोहरी यांची निवड करण्यात आली आहे. याआधी जोहरी हे ‘डिस्कव्हरी’ नेटवर्कच्या दक्षिण-पूर्व आशियाई विभागाचे महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. येत्या १ जूनपासून ते बीसीसीआयच्या सीईओपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.

मुंबई-पुणे संघांचा एक मेचा सामना पुण्यातच
आयपीएलच्या ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ या संघादरम्यान १ मे रोजी होणारा सामना पुण्यामध्येच खेळू देण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. त्यामुळे हा सामना आता पुण्यातच गहुंजे येथील मैदानावर होणार हे निश्चित झाले आहे.

नोव्हाक, सेरेना यांना लॉरेस पुरस्कार
नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स, टेनिस जगतातील या दोन दिग्गज खेळाडूंना मंगळवारी ‘लॉरेस जागतिक क्रीडा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. नोव्हाक आणि सेरेना यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात तिसऱ्यांदा वर्षांतील सर्वोत्तम क्रीडापटूंचा मान पटकावला. जगभरातील विविध क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत हा सोहळा बर्लिन येथे पार पडला. या वेळी माजी फॉम्र्युला वन विश्वविजेता निकी लॉडाला ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

पुरस्काराचे मानकरी
सर्वोत्तम क्रीडापटू (पुरुष) : नोव्हाक जोकोव्हिच (सर्बिया, टेनिस)
सर्वोत्तम क्रीडापटू (महिला) : सेरेना विल्यम्स (अमेरिका, टेनिस)
सर्वोत्तम संघ : न्यूझीलंड, रग्बी
कलाटणी देणारा खेळाडू : जॉर्डन स्पिएथ (अमेरिका, गोल्फ)
दमदार पुनरागमन करणारा खेळाडू : डॅन कार्टर (न्यूझीलंड, रग्बी)
सर्वोत्तम क्रीडापटू (विकलांग विभाग) : डॅनिएल डायस (ब्राझील, जलतरण)
सर्वोत्तम शैलीदार खेळाडू : जॅन फ्रोडेनो (जर्मनी, ट्रायथ्लॉन)

अर्थव्यवस्था

निर्यात पुन्हा रोडावली
रांगेत सलग १६ व्या महिन्यात घसरताना देशातील निर्यात मार्चमध्ये २२.७१ अब्ज डॉलरवर येऊन ठेपली आहे. वार्षिक तुलनेत त्यात ५.४७ टक्के घसरण झाली आहे. आयातीत २१.५६ टक्के (२७.७८ अब्ज डॉलर) घसरण झाली असून व्यापार तूट गेल्या महिन्यात ५.०७ अब्ज डॉलर राहिली आहे. आयात – निर्यातील फरक समजली जाणारी व्यापार तूट वर्षभरापूर्वी – मार्च २०१५ मध्ये ११.३९ अब्ज डॉलर होती.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now