Current Affairs : 20 September 2020
‘रॉ’ चे माजी प्रमुख अनिल धस्माना NTRO चे नवीन चीफ

रिसर्च अँड अॅनलिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’ चे माजी प्रमुख अनिल धस्माना यांची नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उपग्रह फोटो आणि टेक्निकल इंटेलिजन्सची जबाबदारी NTRO वर आहे.
धस्माना आयबीचे माजी अधिकारी सतीश झा यांची जागा घेतील.
अनिल धस्माना १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते पाकिस्तानच्या विषयातील तज्ज्ञ असून मागच्यावर्षी पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. त्याच्या आखणीमध्ये धस्माना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
धस्माना पुढची दोनवर्ष NTRO च्या प्रमुखपदी असणार आहेत.
मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी असणारे अनिल धस्माना यांनी १९९३ साली ‘रॉ’ मध्ये काम सुरु केले. ‘रॉ’ कडे भारताच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी आहे.
दिल्ली ते लंडन बस धावणार ; १८ देशातून प्रवास

अॅडव्हेंचर ओव्हरलँड या पर्यटन कंपनीने जगातील सर्वात मोठी रोड ट्रीप जाहीर केली असून हा प्रवास २०२१ पासून सुरू होणार आहे.
भारताची राजधानी दिल्लीतून निघणारी ही बस अनेक देशांचा प्रवास करत ब्रिटनची राजधानी लंडनला पोहोचणार आहे.
या पर्यटन कंपनीने आपल्या पोस्टमध्ये या अँडव्हेंचर ट्रीपची माहिती दिली आहे. प्रवाशांना ७० दिवसात १८ देशांमधून २० हजार किमीचा प्रवास करावा लागणार आहे.
या बसमधील प्रवाशांना म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, कझाखस्तान, किर्गीस्तान, उझबेकिस्तान, रशिया, लिथुआनिया, लॅटविया, पोलंड, शेज रिपब्लिक, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांमध्ये वेळ घालवता येईल.
महिलांना लष्करातील वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग खुला; सिलेक्शन कमिशन नेमण्यात आले
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महिलांना लष्करातील वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता यासाठी लष्करातर्फे निवड आयोग म्हणजेच सिलेक्शन कमिशन नेमण्यात आले असून, दिल्ली येथील लष्कराच्या मुख्यालयात या आयोगाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.
लष्करी सेवेत महिलांना परमनंट कमिशन म्हणजेच कायमस्वरूपी पदावर नियुक्ती मिळावी, असा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
यामुळे महिलांना कर्नल रॅंकपेक्षा वरिष्ठ रॅंकवर नियुक्ती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. तसेच यामुळे लष्करी प्रशिक्षण, संशोधन आणि कार्यालयीन आस्थापनांच्या प्रमुखपदी नियुक्ती मिळणार आहे.
मात्र, यासाठी महिला व पुरूष दोन्ही अधिकाऱ्यांची निवड ही सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून केली जाते. त्यानुसार महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी लष्कर प्रशासनातर्फे या आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच ब्रिगेडियर रॅंकच्या महिला अधिकारी या आयोगात निरीक्षक म्हणून काम पाहतील. यामुळे निवड प्रक्रियेत पारदर्शकता राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.