देश-विदेश
ताश्कंदमध्ये मोदी आणि क्षी जिनपिंग यांची भेट
# पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी ताश्कंदमध्ये चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी याठिकाणी दोन दिवसीय शांघाय सहकार्य परिषदेसाठी (एससीओ) दाखल झाले आहेत. मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीत भारताच्या एनएसजी सदस्यत्वासंबंधी चर्चा झाल्याची शक्यता आहे. अण्वस्त्र पुरवठादार गटात सदस्यत्व मिळण्याचा भारत प्रयत्न करीत असून चीनने त्यामध्ये अडसर निर्माण केला आहे त्यामुळे चीनने भारताच्या या प्रयत्नाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी मोदी या भेटीच्या वेळी जिनपिंग यांच्याकडे करणार असल्याची चर्चा होती. या परिषदेत मोदींची शिष्टाई फळाला येणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
एनएसजी बैठकीसाठी परराष्ट्र सचिव दक्षिण कोरियाला रवाना
# अणु साहित्य पुरवठादार गटाचे सदस्यत्व भारताला मिळवून देण्यासाठी प्रयत्नांचा भाग म्हणून परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे एनएसजी बैठकीसाठी दक्षिण कोरियातील सोलला रवाना झाले आहेत. भारताला सदस्यत्व मिळू नये यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. ४८ देशांची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून आता ती अंतिम टप्प्यात असताना जयशंकर तिकडे रवाना झाले आहेत. भारताला एनएसजी सदस्यत्व मिळावे यासाठी विविध देशांचे मन वळण्याच्या प्रयत्न ते करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी अमनदीप सिंग गिल हे अगोदरच सोलमध्ये असून ते भारताची बाजू मांडत आहेत. चीनने भारत एनपीटी कराराचा स्वाक्षरीदार नसल्याने पुन्हा एकदा विरोध सुरूच ठेवला आहे.
पनामा पेपर्सप्रकरणी तीन अहवाल सरकारला सादर
# पनामा पेपर्स प्रकरणी चौकशी करणाऱ्या बहुसंस्थात्मक चौकशी गटाने तीन अहवाल सरकारला सादर केले आहेत. पनामा पेपर्समध्ये ५०० भारतीयांची नावे आली आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काळा पैसा व इतर प्रकरणात नेमण्यात आलेल्या या विशेष चौकशी पथकाला माहिती दिली आहे असे महसूल खात्याने सांगितले. बहुसंस्थात्मक गटाने सरकारला तीन अहवाल दिले आहेत. पनामा प्रकरणातील पैसे परदेशात कायदेशीर की बेकायदेशीर मार्गाने गुंतवले आहेत हे पाहण्यासाठी सरकारने एप्रिलमध्ये बहुसंस्थात्मक चौकशी समिती नेमली होती, त्यात रिझव्र्ह बँक, प्राप्तिकर खाते व आर्थिक गुप्तचर खाते, परराष्ट्र कर व कर संशोधन या विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
उत्तर कोरियाच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी पुन्हा फसली
# उत्तर कोरियाने बुधवारी दोन क्षेपणास्त्रे सोडली असून ती मध्यम पल्ल्याची होती. ती बहुदा मुसुदान ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असावीत, असे अमेरिका व दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एप्रिलपासून या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्याचे अनेक प्रयत्न झाले. बुधवारी पाचवा व सहावा प्रयत्न करण्यात आला. यातील पाच प्रयत्न फसले असून अनेकदा ही क्षेपणास्त्रे आकाशात उडाल्यानंतर फुटली. सहाव्या प्रयत्नात हे क्षेपणास्त्र ४०० किलोमीटर गेले. दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले, की क्षेपणास्त्रात प्रगती दिसत असली, तरी ते ३५०० कि.मी.चा टप्पा गाठू शकणार नाही. त्यामुळे ते मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. अनेकदा अपयश येऊनही उत्तर कोरियाने निर्धार सोडलेला नसून मुसुदान क्षेपणास्त्रे ही अमेरिका व मित्र देशांना डोकेदुखी ठरली आहे कारण या क्षेपणास्त्रामुळे आशिया, पॅसिफिक व अमेरिकेचा ग्वाम लष्करी तळ अशी अनेक ठिकाणे उत्तर कोरियाच्या टप्प्यात येतात.
दूरसंचार ध्वनिलहरी लिलावाच्या ५.६६ लाख कोटींच्या योजनेला मंजुरी
# केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आजवरच्या सर्वात मोठय़ा ५.६६ लाख कोटी रुपयांच्या दूरसंचार ध्वनिलहरी (स्पेक्ट्रम) लिलावाच्या योजनेला मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. नवोद्योगांसाठी (स्टार्टअप्स) १० हजार कोटी रुपयांचा निधी, कापड उद्योगाला उभारी देणारे ६००० कोटींचे विशेष अर्थसहाय्य आणि कर्नाटकातील महामार्ग प्रकल्पासाठी २२७२ कोटी रुपयांना मंजूरी देणाऱ्या मंत्रिमंडळाच्या अन्य बडय़ा निर्णयांची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य विद्युत मंडळावरील आर्थिक भार कमी करणाऱ्या ‘उदय’ योजनेस मुदतवाढ देण्याचाही केंद्राने निर्णय घेतला आहे. वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या निर्णयामुळे या क्षेत्रात तीन वर्षांत १ कोटी रोजगार निर्माण होणार असून ११ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक व ३० अब्ज डॉलर्सची निर्यात अपेक्षित आहे. तर नवोद्योगातून१८ लाख रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
क्रीडा
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा ‘जम्बो’कडे
# भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) धरमशाला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘जम्बो’च्या अर्थात अनिल कुंबळेच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पुढील एका वर्षासाठी अनिल कुंबळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळतील, असे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले. कुंबळेच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९५६ बळी आहेत. याशिवाय, कुंबळेने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मेन्टॉर म्हणून काम पाहिले आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी एकूण ५७ अर्ज आले होते. या अर्जाची छाननी करून २१ उमेदवारांची निवड करण्यात आली होती.