1) माेटरसायकलवर मागे बसणाऱ्यांसाठी सेफ्टी हँडल,साइड गार्ड बंधनकारक
सुप्रीम कोर्टाने रस्ते सुरक्षेबाबत शुक्रवारी माेटरसायकलस्वारांसाठी काही नियम सक्तीचे केले. कोर्टाने सेंट्रल व्हेइकल मोटार रूल १२३ च्या कठोरपणे अंमलबजावणीचे आदेश दिले. नियमानुसार माेटरसायकलवर मागे बसलेल्या प्रवाशासाठी सेफ्टी हँडल, फुट रेस्ट व मागील चाकात काही अडकू नये म्हणून साइड गार्ड लावणे बंधनकारक आहे. नव्या गाड्यांना हा आदेश लागू राहील. वाहन कंपन्यांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमाेबाइल मॅन्युफॅक्चरर्सची (सियाम) याचिका फेटाळत कोर्टाने हे आदेश दिले. याचिकेत मध्य प्रदेश हायकोर्टाच्या नोव्हेंबर २००८ मधील निकालाला आव्हान दिले होते. हायकोर्टाने ज्ञानप्रकाश यांच्या याचिकेवर सुनावणी करताना आदेशात सेंट्रल व्हेइकल रूल १२३ चे पालन सक्तीचे केले होते. सियामने त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केले होते. ज्ञानप्रकाश यांनी सांगितले की, बहुतांश वाहन कंपन्या ३ दशकांपासून हे नियम पाळत नाहीत. यामुळे माेटरसायकल अपघात वाढले आहेत.
2) प्रिया वरियारने इन्स्टाग्रामचा मालक झुकेरबर्गला 13 दिवसांत टाकले मागे
इंटरनेट जगतात खळबळ उडवून देणारी मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाशने इन्स्टाग्रामचा मालक मार्क झुकेरबर्गला मागे टाकले आहे. येथे प्रियाचे ४५ लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. तर मार्कचे ४० लाख फाॅलोअर्स आहेत. झुकेरबर्ग ७ वर्षांपासून इन्स्टाग्रामवर आहे तर प्रियाला फक्त दीड वर्षे झाली आहेत. विशेष म्हणजे, प्रियाने त्याला अवघ्या १२ दिवसांत मागे टाकले आहे. यापूर्वी तिला फक्त ५ लाख फॉलोअर्स होते.
3) ‘लोकपाल’ नियुक्तीसाठी निवड समितीची १ मार्च रोजी बैठक
चार वर्षांपूर्वी कायदा लागू झाल्यानंतर ‘लोकपाल’ नियुक्तीसाठी निवड समितीच्या पहिल्या बैठकीसाठी अखेर मुहूर्त मिळाला असून १ मार्च रोजी बैठक बोलाविण्यात आली आहे. लोकपाल व लोकायुक्त कायदा २०१४ मध्ये आल्यानंतर प्रथमच लोकपाल निवड समितीची बैठक होत आहे. या समितीत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, सरन्यायाधीश किंवा त्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी आणि एका प्रख्यात विधिज्ञांचा समावेश आहे. मात्र समितीमधील नामनियुक्त विधिज्ञ पी. पी. राव यांचे सप्टेंबर २०१७ मध्ये निधन झाल्याने त्यांच्या जागी एका अन्य विधिज्ञाची निवड केली जाईल. संसदेने २०१३ मध्ये कायदा केल्यानंतर राष्टÑपतींच्या मंजुरीनंतर २०१४ मध्ये तो अस्तिवात आला. कायदा करूनही लोकपालांची नियुक्ती झाली नाही. विरोधी पक्षनेत्याअभावी निवड समितीचे कामकाज न झाल्याने लोकपालांची नियुक्ती होऊ शकली नाही, अशी सबब मोदी सरकारने पुढे केली होती.
4) राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान
येत्या एप्रिल आणि मे महिन्यात 16 राज्यांमधील राज्यसभेच्या एकूण 58 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 58 जागांसाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 12 मार्च आहे. तर या जागांसाठी 23 मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये महाराष्ट्रामधील सहा जागांचा समावेश आहे. कार्यकाळ संपत असलेल्या प्रमुख सदस्यांमध्ये अरुण जेटली, थावरचंद गेहलोत, प्रकाश जावडेकर, जगतप्रकाश नड्डा, धर्मेंद्र प्रधान, रविशंकर प्रसाद या सहा मंत्र्यांचा समावेश आहे. तसेच सचिन तेंडुलकर, जया बच्चन, रेखा, चिरंजीवी, हे नामवंतही एप्रिलमध्ये निवृत्त होत आहेत. कार्यकाळ संपत असलेल्या महाराष्ट्रातील सदस्यांमध्ये वंदना चव्हाण, डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील, राजीव शुक्ला (काँग्रेस), अजय संचेती (भाजपा), अनिल देसाई (शिवसेना) यांचाही त्यात समावेश आहे.
5) गोव्यातील आगोंद किनारा आशियात सर्वोत्कृष्ट, जागतिक यादीत 18 व्या स्थानावर
वार्षिक ट्रेव्हलर्स चॉईस पुरस्काराच्या आशियाई यादीत गोव्याच्या आगोंद बीचला पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. ट्रेव्हलर्स चॉईसच्या आशियाई यादीत एकूण पाच भारतीय किना-यांना स्थान मिळाले असून या यादीत चौथ्या स्थानावर अंदमान व निकोबार बेटावरील राधानगर बीचचे नाव आहे. गोव्यातील बाणावली, मांद्रे व पाळोळे हे समुद्रकिनारे अनुक्रमे 15, 18 व 20 व्या स्थानावर आहेत. ट्रेव्हलर्स चॉईस पुरस्कार ट्रीप अॅडव्हायजर या पर्यटन साईटवरील बुकिंग्सवर आधारित असतो. दक्षिण गोव्यातील अगदी टोकाचा तालुका असलेल्या काणकोणातील आगोंद बीच हा सौंदर्याने नटलेला किनारा असून, ट्रेव्हलर्स चॉईसच्या जागतिक यादीत पहिल्या पंचवीस किना-यांमध्ये त्याला स्थान मिळाले असून, या यादीत तो 18व्या स्थानावर आहे. भारतातील उत्कृष्ट पंचवीस किना-यांमध्ये आगोंदला पहिले स्थान प्राप्त झाले आहे. तुर्क आणि कायकोस येथील ग्रेस बे व प्रोव्हिडेन्शियल्स हे किनारे जागतिक यादीत पहिल्या स्थानावर असून या पाठोपाठ ब्राझीलचे बाय द सांचु व फेर्नादो द नोरोन्हा, क्युबाचा वाराडेरो बीच, अरुबाचा ईगल बीच व केमन बेटावरील सेव्हन माईल बीच यांचा क्रमांक लागतो.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.