देश-विदेश
‘ब्रेक्झिट’नंतर डेव्हिड कॅमेरून यांचेही ‘एक्झिट’चे संकेत
# ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने ब्रिटनकरांनी कौल दिल्यानंतर ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रेक्झिटचा कौल जनतेने दिल्यानंतर कॅमेरुन यांनी ब्रिटनमधील ‘डाऊनिंग स्ट्रीट’वर पत्रकार परिषद घेऊन आपले भूमिका स्पष्ट केली. परिषदेत कॅमेरुन यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. ते म्हणाले की, ब्रिटनच्या नागरिकांना आता नवा पर्याय निवडला आहे. यासाठी त्यांना आता नव्या नेतृत्त्वाची गरज आहे. युरोपियन महासंघातून बाहेर पडलेल्या ब्रिटनचे नेतृत्त्व मी आता करून शकेन, असे वाटत नाही. ब्रिटन सरकारची नौका स्थिर राहण्यासाठी मी आणखी काही आठवडे किंवा काही महिने शक्य तेवढे प्रयत्न करेन, पण या नव्या उद्देशाने प्रेरित झालेल्या ब्रिटनच्या नौकेचे नेतृत्त्व करण्यासाठी प्रयत्न करणे मला योग्य वाटत नाही.
‘ब्रेक्झिट’ला तोंड देण्यास भारत समर्थ- अरुण जेटली
# भारतीय अर्थव्यवस्था अतिशय मजबूत असून, युरोपियन महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्यामुळे होणाऱया परिणामांना सामोरे जाण्यासाठी आपला देश समर्थ असल्याचा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा कौल तेथील जनतेने दिल्यानंतर अरुण जेटली यांनी त्वरित एक निवेदन प्रसिद्ध केले. ब्रेक्झिटमुळे होणाऱया परिणामांची भारतीयांना चिंता करण्याचे गरज नसल्याचे जेटली यांनी निवेदनात म्हटले आहे.
एक्स-रे प्लेट्स, प्लास्टिक, आरशाच्या पुनर्वापरातून घडली ‘रिओ ऑलिम्पिक’ची पदके
# ‘रिओ ऑलिम्पिक २०१६’च्या विजेत्यांना देण्यात येणा-या पदकांची छायाचित्रे नुकतीच ऑलिम्पिक समितीतर्फे प्रदर्शित करण्यात आली आहेत. या छायांचित्रांमध्ये सुवर्ण, रजत, कास्य आणि पॅरालिम्पिक पदकांचा समावेश आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणा-या पदकांची विशेष दखल घेणे आवश्यक आहे. कारण ही पदके बनवण्यासाठी जुने आरसे, एक्स-रे प्लेट्स आणि सोल्डरमध्ये वापरण्यात येणा-या तारेचा पुनर्वापर करण्यात आला असून त्यामध्ये ३० टक्के चांदीचा वापर करण्यात आला आहे. तर कास्य पदक बनविण्यासाठी टाकाऊ तांबे वापरण्यात आले आहे. पदकांना लावण्यात आलेल्या रिबीनी या प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार करण्यात आल्या आहेत. ऑलिम्पिकच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक पदकावर पारंपारिक लॉरेल पानांची नक्षी असून त्यावर रिओ ऑलिम्पिकचे बोधचिन्ह कोरण्यात आले आहे. तर पदकाच्या दुस-या बाजूस यशाची देवता मानल्या जाणा-या ग्रीक देवतेची प्रतिकृती कोरण्यात आली आहे. एकूण ५१३० पदकांची निर्मिती ब्राझिलच्या टाकसाळीतर्फे करण्यात आली आहे.
ब्रिटनकरांचा ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने कौल
# ब्रिटनने युरोपिय महासंघात राहावे की बाहेर पडावे, यावरील जनमत जाणण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानाचे निकाल आले असून, ब्रिटनमधील नागरिकांनी महासंघातून बाहेर पडावे (ब्रेक्झिट) याच बाजूने कौल दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटनमधील आघाडीचे माध्यम ‘बीबीसी’ने ब्रेक्झिटच्या बाजूनेच कौल असल्याचे जाहीर केले आहे. बाहेर पडावे या बाजूने ५१.९० टक्के जणांनी मतदान केले. तर ४८.१० टक्के मतदारांनी युरोपिय महासंघात राहण्याच्या बाजूने मत टाकले. एकूण मतदानापैकी १ कोटी ७४ लाख १० हजार ७४२ मतदारांनी बाहेर पडावे, या बाजूने मतदान केले, तर एक कोटी ६१ लाख ४१ हजार २४१ मतदारांनी युरोपिय महासंघात राहण्याचे बाजूने पसंती दिली. बाहेर पडावे (लीव्ह) आणि युरोपिय महासंघातच राहावे (रिमेन) या दोन्ही बाजूंमधील फरक सातत्याने वाढतच गेला.
भारताच्या एनएसजी गटातील समावेशाला पाच देशांकडून विरोध
# अणु साहित्य पुरवठादार गटात (एनएसजी) भारताच्या समावेशाला एकट्या चीनचा विरोध नसून अन्य राष्ट्रांचाही विरोध असल्याचे गुरूवारी सेऊल येथे सुरू असलेल्या एनएसजी बैठकीदरम्यान समोर आले . ब्राझील, न्यूझीलंड, आयर्लंड, तुर्की या देशांनी एनपीटी कराराच्या मुद्द्यावरून भारताच्या एनएसजीमधील समावेशाला विरोध केला आहे. त्यामुळे भारताच्या एनएसजीमधील समावेशाला चीनसह पाच देशांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीत मेक्सिकोने पंतप्रधान मोदींना दिलेले आश्वासन पाळत भारताच्या समावेशाला पाठिंबा दर्शविला. ब्रिक्स गटातील ब्राझीलने केलेला विरोध हा भारतासाठी अनपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. एनएसजी गटातील ४८ देशांची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून आता ती अंतिम टप्प्यात आहे. गटाचे सदस्यत्व भारताला मिळवून देण्यासाठी प्रयत्नांचा भाग म्हणून परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे एनएसजी बैठकीसाठी दक्षिण कोरियातील सोलला रवाना झाले होते.
क्रीडा
अमेरिकेत ‘मिनी-आयपीएल’ खेळविण्याचा ‘बीसीसीआय’चा मानस
# इंडियन प्रिमिअर लीगमधील(आयपीएल) आठ संघांना घेऊन अमेरिकेत तीन आठवड्यांची मिनी-आयपीएल स्पर्धा खेळविण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा(बीसीसीआय) मानस असल्याची माहिती ट्वेन्टी-२० लीग गर्व्हनिंग काऊन्सिलमधील एका अधिकाऱयाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राशी बोलताना दिली.
आयसीसीकडून ट्वेन्टी-२० चॅम्पियन्स लीग संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याकडे ट्वेन्टी-२० ची एक नवीन स्पर्धा आयोजित करण्यासाठीचा वेळ नक्कीच आहे. आठ संघांना घेऊन मिनी-आयपीएल सुरू करण्याचा आमचा विचार आहे, पण अद्याप ठिकाण निश्चित झालेले नसले तरी अमेरिका या पर्यायाचा विचार केला जात आहे, असे ट्वेन्टी-२० गर्व्हनिंग काऊन्सिलच्या अधिकाऱयाने सांगितले.
विकास कृष्णन, मनोज कुमार ऑलिम्पिकसाठी पात्र
# आशियाई क्रीडा स्पध्रेतील विजेता विकास कृष्णन (७५ किलो) आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेतील माजी सुवर्णपदक विजेत्या मनोज कुमारने (६४ किलो) एआयबीए जागतिक पात्रता बॉक्सिंग स्पध्रेची उपांत्य फेरी गाठून रिओ ऑलिम्पिकमधील आपले स्थान निश्चित केले. ऑलिम्पिकसाठी आता तीन भारतीय बॉक्सिंगपटूंनी स्थान निश्चित केले आहे. उपांत्यपूर्व फेरीत विकासने कोरियाच्या ली डाँगयुनचा ३-० असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत विकास तुर्कमेनिस्तानच्या अचिलोव्ह अर्सलॅनबेकशी सामना करणार आहे. अचिलोव्हने इटलीच्या कॅव्हालारो सॅल्व्हाटोरला पराभूत केले.
अर्थव्यवस्था
ब्रेक्झिटमुळे रुपयाची गटांगळी
# ब्रिटनमधील नागरिकांनी ब्रेक्झिटच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट होऊ लागल्यावर त्याचा अपेक्षित परिणाम शुक्रवारी भारतीय रुपयावरही दिसला. सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया तब्बल ८९ पैशांनी घसरला. या घसरणीनंतर रुपया ६८.१७ वर जाऊन पोहोचला.
‘एलआयसी’ अध्यक्षांची मुदतपूर्व निवृत्ती
# सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव आयुर्विमा कंपनी आणि भांडवली बाजारातील प्रचंड मोठी गुंतवणूकदार संस्था – भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) अध्यक्ष एस. के. रॉय यांनी बुधवारी सायंकाळी व्यक्तिगत कारणाने पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या नियोजित कार्यकाळाची आणखी दोन वर्षे शिल्लक होती.