‘यूट्यूब’ वापरामध्ये आशियात भारत अव्वल
- प्रमुख व्हिडिओ प्लॅटफॉर्म यूट्यूबचा मोठ्या प्रमाणावर पगडा आशियाई देशांवर पडला असून, आशिया खंडातील पाच देशांमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. उपयोग करणाऱ्यांची संख्या, सेवा वापरणाऱ्यांचे प्रमाण या दोन्ही बाबतीत हेच पाच देश जगभरात अव्वल स्थानी आहेत.
- यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वाधिक वेळ खर्च करण्यात भारत, इंडोनेशिया, जपान, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांनी आघाडी घेतली आहे. ‘या पाच देशांमध्ये वार्षिक आधारावर यूट्यूबच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही देशांमध्ये वाढीचा दर दुप्पट तर, काही देशांमध्ये तिप्पट असल्याचे आढळून आले आहे.
ट्रम्प-किम चर्चेच्या अपयशावर आता रशियात खलबते
- उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबरच्या शिखर बैठकीसाठी व्लादिवोस्तोक येथे दाखल झाले आहेत. पुतिन यांच्यासमवेत त्यांची पहिलीच शिखर बैठक होत असून बुधवारी त्यांचे येथे आगमन झाले.
- उत्तर कोरियाने अमेरिकेबरोबर अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या संदर्भात सुरू असलेल्या पेचप्रसंगात रशियाचा पाठिंबा मागितला आहे. ही शिखर बैठक गुप्तपणे आयोजित करण्यात आली होती, पण अखेरच्या क्षणी त्याबाबत घोषणा करण्यात आली.
- पुतिन यांच्यासमवेत किम यांची ही पहिलीच बैठक असून त्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत हनोई येथे फेब्रुवारीत झालेल्या बैठकीतील वाटाघाटी व त्यातील अपयशाची कारणे याबाबत चर्चा करणार आहेत.
व्लादिवोस्तोक येथे विद्यापीठ आवारात शिखर बैठक होणार आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने ‘टीक-टॉक’अॅपवरील उठवली बंदी
- मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘टीक-टॉक’ अॅपवरील बंदी उठवली आहे. भारतामध्ये पाच कोटीपेक्षा जास्त युझर असल्याचा टीक-टॉक अॅपचा दावा आहे.
- पॉर्नोग्राफीक कंटेटमुळे मद्रास उच्च न्यायालयाने तीन एप्रिलला केंद्र सरकारला टीक-टॉक अॅपवर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते.
आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा : संजीवनी जाधवची कांस्यपदकाची कमाई!
- भारताच्या ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले चमूने आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे, तर संजीवनी जाधवने १० हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.
- ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले हा प्रकार अॅथलेटिक्स स्पर्धात यंदा प्रथमच समाविष्ट करण्यात आला आहे. भारताच्या मोहम्मद अनास, एम. आर. पूवम्मा, व्ही. के. विस्मया आणि अरोकिया रावजी या चमूने ३:१६.४७ मिनिटे वेळ राखून दुसरे स्थान मिळवले.
आशियाई कुस्ती स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुलला कांस्यपदक!
- आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात भारतीय खेळाडू अमित धानकरने रौप्यपदक, तर राष्ट्रकुल विजेत्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेने कांस्यपदकाची कमाई केली.
- २०१३मध्ये ६६ किलो गटात सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अमितला ७४ किलो फ्रीस्टाइल प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या डॅनियार कैसानोव्हाने त्याचा ५-० असा पराभव केला.
- अमितने पात्रता फेरीत इराणच्या अश्घर नोखोडिलारिमीवर २-१ असा निसटता विजय मिळवला. मग उपांत्यपूर्व सामन्यात जपानचा युही फुजिनामी जखमी झाल्यामुळे त्याला पुढे चाल मिळाली. त्यानंतर उपांत्य सामन्यात अमितने किर्गिझस्तानच्या इगिझ डहाकबेकोव्हाला ५-० असे नमवले.
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहुलने ६१ किलो फ्रीस्टाइल प्रकारातील कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाच्या जिनचेओल किमचा ९-२ असा पाडाव केला.
- पात्रता सामन्यात राहुलने उझबेकिस्तानच्या जाहोंगिर मिर्झाला तांत्रिक गुणाआधारे १०-० असे नमवले. मग उपांत्यपूर्व सामन्यात २७ वर्षीय राहुलला इराणच्या बेहनाम इशाघ एहसानपूरकडून पराभव पत्करावा लागला.
सातपाटीमधील तरुणाचे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर यश
- नरेंद्र किणी या १४ वर्षीय तरुणाने त्याने केलेल्या बचतीच्या पैशातून किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सहभागी होऊन त्यांनी विजेतेपद मिळविले आहे.
- जून २०१८ मध्ये हिमाचल प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत मोहितने पुन्हा रौप्य पदक पटकाविले. आत्तापर्यंत मोहित किणी हा चार जिल्हा, पाच राज्ये व एका राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धामध्ये निवडला गेला आहे व सहा सुवर्ण, पाच रौप्य व दोन कांस्य पदकांचा मानकरी ठरला आहे.