⁠
Uncategorized

चालू घडामोडी – २५ जून २०१६

देश-विदेश

भारताला ‘एनएसजी’ सदस्यत्व नाहीच
# चीनच्या ताठर भूमिकेमुळे अणुपुरवठादार गटाच्या (एनएसजी) बैठकीत भारताला सदस्यत्व देण्याचा निर्णय होऊ शकला नाही. भारताने अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी केलेली नाही, त्यामुळे भारताला एनएसजीचे सदस्यत्व देण्यास आमचा विरोध आहे, अशी चीनची भूमिका होती. चीनच्या या भूमिकेस दहा देशांनी पाठिंबा दिल्याने भारताला एनएसजी सदस्यत्व मिळण्याच्या आशा मावळल्या.

क्रीडा

सप्टेंबरमध्ये परदेशात छोटेखानी आयपीएल घेण्यासाठी बीसीसीआय सज्ज
# आयपीएलची लोकप्रियता परदेशातही वाढावी या दृष्टीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सप्टेंबरमध्ये लहान स्वरूपाची आयपीएल स्पर्धा आयोजित करणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर याबाबत म्हणाले, ‘बीसीसीआयच्या कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र या लीगचे स्वरूप लहान असेल. दोन आठवडेच ही स्पर्धा चालणार आहे. आयपीएलसारखे घरचे मैदान व प्रतिस्पर्धी संघाचे मैदानांतील सामने अशा स्वरूपाचे आयोजन न करता कमी कालावधीत ही स्पर्धा कशी आयोजित केली जाईल याचा आम्ही विचार करीत आहोत.’

विकास व मनोज यांना कांस्यपदक
# ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केलेल्या विकास कृष्णन (७५ किलो) व मनोज कुमार (६४ किलो) यांना ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने एल. देवेंद्रो सिंगचे रिओवारी हुकणार आहे. दुखापतीमुळे विकासला तुर्कमेनिस्तानच्या अ‍ॅचिलोव्ह अर्सेलानबेक याच्याविरुद्धच्या लढतीत भाग घेता आला नाही. मनोजला युरोपियन विजेता पॅट मॅकोर्माक या इंग्लंडच्या खेळाडूने ३-० असे पराभूत केले.
भारताच्या सुमित संगवानला ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित करण्यात अपयश आले. त्याला ८१ किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित पेत्र खामुकोव या रशियन खेळाडूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पेत्रने या गटात सुवर्णपदक मिळविले असते.

भारताची धावपटू द्युती चंद ऑलिंपिकसाठी पात्र
# नवी दिल्ली : भारतीय धावपटू द्युती चंद हिने महिलांच्या 100 मीटर शर्यतीसाठी ऑलिंपिक पात्रता मिळविली आहे. कझाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत आज (शनिवार) द्युतीने पात्रतेसाठी आवश्‍यक असलेली कामगिरी नोंदविली. रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली द्युती ही 99 वी भारतीय खेळाडू आहे. रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी महिलांच्या 100 मीटर शर्यतीसाठी 11.32 सेकंद ही पात्रतेसाठीची आवश्‍यक कामगिरी होती. द्युतीने आज 11.30 सेकंद अशी वेळ नोंदविली.

अर्थव्यवस्था

‘ब्रेग्झिट’नंतर अर्थसंकट!
# युरोपीय संघात राहायचे की बाहेर पडायचे, या मुद्दय़ावर घेतलेल्या सार्वमतात ब्रिटिश जनतेने युरोपीय संघातून बाहेर पडून सवतासुभा मांडण्याच्या बाजूने कौल दिल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक निकालाने युरोपीय संघ तर ढवळून निघाला आहेच, शिवाय जागतिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला आहे. ब्रेग्झिटच्या या प्रलयामुळे जगभरातील भांडवली बाजारांत प्रचंड पडझड झाली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालानंतर ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी पदत्याग करत असल्याचे जाहीर केले. ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडावे यासाठी जोरदार प्रचार करणारे बोरिस जॉन्सन आता पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

Related Articles

Back to top button